हॅट्ट्रिकचे श्रेय कोहलीला!

हॅट्ट्रिकचे श्रेय कोहलीला!

जसप्रीत बुमराहचे उद्गार

भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसर्‍या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात हॅट्ट्रिकची नोंद केली. कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिक मिळवणारा बुमराह हा भारताचा तिसरा गोलंदाज आहे. याआधी ऑफस्पिनर हरभजन सिंग (२००१, ऑस्ट्रेलियाविरुद्ध) आणि डावखुरा वेगवान गोलंदाज इरफान पठाण (२००६, पाकिस्तान) या भारतीयांनी कसोटी क्रिकेटमध्ये हॅट्ट्रिकची नोंद केली होती. बुमराहने या डावाच्या नवव्या षटकात डॅरेन ब्रावो, शमार ब्रूक्स आणि रॉस्टन चेस यांना सलग चेंडूंवर बाद केले. चेसला पंचांनी नाबाद ठरवले होते, तर बुमराहनेही अपील केली नाही.

मात्र, कर्णधार विराट कोहलीने रिव्ह्यूव घेतला आणि यात चेसच्या पॅडला लागलेला चेंडू स्टम्पला आदळत असल्याचे आढळले. तिसर्‍या पंचांनी चेसला बाद दिले आणि बुमराहची हॅट्ट्रिक पूर्ण झाली. त्यामुळे सामन्यानंतर बुमराहने हॅट्ट्रिकचे श्रेय कर्णधार कोहलीला दिले.

मी अपील करण्याबाबत आणि त्यानंतर रिव्ह्यूव घेण्याबाबत विचार करत नव्हतो. मला चेंडू चेसच्या बॅटला लागला असे वाटले. मात्र, शेवटी रिव्ह्यूव घेण्याचा निर्णय योग्य ठरला. त्यामुळे माझ्या हॅट्ट्रिकचे श्रेय कर्णधाराला जाते, असे बुमराह कर्णधार कोहलीशी संवाद साधताना म्हणाला.

उपकर्णधार अजिंक्य रहाणेला चेंडू आधी चेसच्या पॅडला लागला असे वाटल्याने आम्ही रिव्ह्यूव घेतला, असे कोहलीने सांगितले. मी रहाणेला त्याचे मत विचारले. त्याला वाटत होते की, चेंडू फलंदाजाच्या बॅटला नक्की लागला आहे. परंतु, तो आधी बॅटला लागला की पॅडला याबाबत साशंकता होती. मात्र, अजिंक्य आणि मला वाटले की चेंडू आधी पॅडलाच लागला. त्यामुळे आम्ही रिव्ह्यूव घेतला. आमचा तो निर्णय योग्य होता याचा मला आनंद आहे.

असे खेळाडू वारंवार घडत नाहीत!

जसप्रीत बुमराहने हॅट्ट्रिक घेतल्यानंतर ट्विटरवरून आजी-माजी खेळाडूंनी त्याचे कौतुक केले. जसप्रीत बुमराहसारखे खेळाडू वारंवार घडत नाहीत, असे वेस्ट इंडिजचे माजी गोलंदाज इयन बिशॉप यांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहिले. तसेच कसोटी क्रिकेटमध्ये भारताकडून पहिली हॅट्ट्रिक मिळवणार्‍या हरभजन सिंगने ट्विटमध्ये लिहिले की, बुमराहने उत्कृष्ट गोलंदाजी केली. हॅट्ट्रिक मिळवणार्‍या खेळाडूंच्या क्लबमध्ये तुझे स्वागत आहे. तुझा खूप अभिमान वाटतो. तसेच भारताचा ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने बुमराहची स्तुती करताना लिहिले, कॅरेबियन बेटांवर अनेक महान वेगवान गोलंदाज होऊन गेले. बुमराहची गोलंदाजी पाहून त्या सर्वांनाच खूप आनंद झाला असता.

First Published on: September 2, 2019 5:53 AM
Exit mobile version