टी-२० क्रिकेटबाबत कोहली,शास्त्रींशी चर्चा करणार -गांगुली

टी-२० क्रिकेटबाबत कोहली,शास्त्रींशी चर्चा करणार -गांगुली

सौरव गांगुलीची प्रकृती बिघडली; छातीत दुखू लागल्याने रुग्णालयात दाखल

भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिला सामना शुक्रवारी हैदराबाद येथे होणार आहे. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार आहे. भारताने २००७ मध्ये झालेला पहिला टी-२० विश्वचषक जिंकला होता. मात्र, त्यानंतर भारताला विश्वविजेतेपद पटकावता आलेले नाही. परंतु, पुढील वर्षीच्या विश्वचषकात भारतीय संघाने दमदार कामगिरी करावी यासाठी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीच्या डोक्यात काही कल्पना आहेत. तो लवकरच याबाबत भारताचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्याशी चर्चा करणार आहे.

टी-२० क्रिकेटमध्ये धावांचा पाठलाग करताना आपण चांगली कामगिरी करत असू, तर प्रथम फलंदाजी करतानाही आपण चांगली कामगिरी केली पाहिजे. टी-२० क्रिकेटबाबत माझ्या डोक्यात काही कल्पना आहेत आणि त्याबाबत मी विराट, रवी, संघ व्यवस्थापन यांच्याशी चर्चा करणार आहे. आपण फारसे टी-२० सामने खेळलेले नाहीत. मात्र, विश्वचषकासाठी हा संघ पूर्णपणे तयार असेल याची मला खात्री आहे, असे गांगुलीने सांगितले.

तसेच गांगुलीने भारतीय संघाच्या कसोटी क्रिकेटमधील कामगिरीचेही कौतुक केले. तो म्हणाला, भारतीय संघाने परदेशात सातत्याने जिंकावे अशी माझी इच्छा आहे. आपण मागील वर्षी ऑस्ट्रेलियात जिंकलो. या संघात न्यूझीलंड आणि पुन्हा ऑस्ट्रेलियात जिंकण्याची क्षमता आहे. आपल्या संघाला सर्वोत्तम कसोटी संघ बनवण्याचे आमचे लक्ष्य आहे.

First Published on: December 6, 2019 5:48 AM
Exit mobile version