IPL 2020 : KKRची लाजिरवाणी कामगिरी! केली यंदाची सर्वात कमी धावसंख्या 

IPL 2020 : KKRची लाजिरवाणी कामगिरी! केली यंदाची सर्वात कमी धावसंख्या 

मोहम्मद सिराज

फलंदाजांच्या निराशाजनक कामगिरीचा फटका कोलकाता नाईट रायडर्स (KKR) संघाला बसला. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धच्या (RCB) आयपीएल सामन्यात कोलकाताच्या संघाला प्रथम फलंदाजी करताना केवळ ८ बाद ८४ धावाच करता आल्या. यंदाच्या आयपीएल स्पर्धेत कोणत्याही संघाने केलेली ही सर्वात कमी धावसंख्या ठरली. यंदाच्या मोसमातील हा ३९ वा सामना आहे. याआधीच्या ३८ सामन्यांत एकाही संघाला शंभर धावा करण्यात अपयश आले नव्हते. त्यामुळे कोलकाताची ही कामगिरी फारच लाजिरवाणी ठरली. कोलकाताचे केवळ चार फलंदाज दुहेरी धावसंख्या करू शकेल.

सिराजच्या तीन विकेट

अबू धाबी येथे होत असलेल्या या सामन्यात कोलकाताचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कोलकाताच्या डावाची खराब सुरुवात झाली. मोहम्मद सिराजने राहुल त्रिपाठी (१), नितीश राणा (०) आणि टॉम बँटन (१०) यांना झटपट बाद केले. तर नवदीप सैनीने युवा सलामीवीर शुभमन गिलला (१) माघारी पाठवले. माजी कर्णधार दिनेश कार्तिक (४) आणि पॅट कमिन्स (४) यांना युजवेंद्र चहलने फार काळ खेळपट्टीवर टिकू दिले नाही. एका बाजूने विकेट जात असताना कर्णधार मॉर्गनने ३४ चेंडूत ३० धावांची खेळी केली. त्यामुळे कोलकाताला ५० धावांचा टप्पा पार करता आला. मॉर्गन बाद झाल्यावर कुलदीप यादव (१२) आणि लॉकी फर्ग्युसन (१९) यांनी काही चांगले फटके मारल्याने कोलकाताने २० षटकांत ८ बाद ८४ अशी धावसंख्या केली. बंगळुरूच्या सिराजने ४ षटकांत अवघ्या ८ धावांतच ३ विकेट घेतल्या.

First Published on: October 21, 2020 9:26 PM
Exit mobile version