SHANE WARNE PASS AWAY : ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचं निधन

SHANE WARNE PASS AWAY : ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचं निधन

SHANE WARN

ऑस्ट्रेलियाचे महान क्रिकेटपटू शेन वॉर्न यांचं निधन झालंय. वयाच्या 52 व्या वर्षी त्यांना हृदयविकाराचा झटका आला असून, त्यातच त्यांचं निधन झालंय. शेन वॉर्न यांनी 1992 मध्ये पहिली टेस्ट मॅच खेळली होती. श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरननंतर ते दुसरे गोलंदाज होते, ज्यांनी 1000 आंतरराष्ट्रीय विकेट मिळवल्या होत्या.

ऑस्ट्रेलियन न्यूज चॅनल फॉक्स स्पोर्टच्या वृत्तानुसार, शेन वॉर्न थायलंडमध्ये होते आणि तेथे त्याचा अचानक संशयास्पद अवस्थेत मृत्यू झाला. शेन वॉर्न यांच्या व्यवस्थापन संस्थेच्या हवाल्याने फॉक्स स्पोर्टने एक निवेदन दिलेय. शेन वॉर्न थायलंडमधील एका व्हिलामध्ये होते, जेथे ते शनिवारी सकाळी (ऑस्ट्रेलियन वेळेनुसार) बेशुद्धावस्थेत आढळले होते, परंतु वैद्यकीय पथकाच्या सर्वतोपरी प्रयत्नांनंतरही ते शुद्धीवर येऊ शकले नाहीत. त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. शेन वॉर्न थायलंडच्या कोह सामुई बेटावर होते आणि तिथे त्यांच्या व्हिलामध्ये राहत होते. शेन वॉर्नच्या कुटुंबीयांनी उर्वरित माहिती योग्य वेळी उपलब्ध करून देणार असल्याचं सांगितलंय.

13 सप्टेंबर 1969 मध्ये जन्मलेल्या शेन वॉर्न यांनी 1992 मध्ये भारताविरुद्ध कसोटीत पदार्पण केले आणि पहिल्या कसोटीत त्यांनी केवळ 2 विकेट मिळवल्या. मात्र त्यानंतर त्यांना रोखणे कठीण झाले आणि प्रत्येक फलंदाज त्यांच्या फिरकीच्या तालावर नाचत राहिला. त्यांच्या जवळपास 16 वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत वॉर्न सर्वाधिक विकेट घेणार्‍यांपैकी एक होते. त्यांनी आपल्या 145 कसोटी कारकिर्दीत 708 विकेट्स घेतल्या आणि श्रीलंकेचा महान खेळाडू मुथय्या मुरलीधरन (800 विकेट) यांच्या मागे दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरले होते. त्यांनी 194 एकदिवसीय सामन्यांमध्ये 293 विकेट्स घेतल्या. 1999 च्या विश्वचषक फायनलमध्ये ते सामनावीर ठरले आणि संघाला विजेतेपद मिळवून दिले.


विशेष म्हणजे शुक्रवार 4 मार्च ऑस्ट्रेलियन क्रिकेटसाठी चांगला दिवस नव्हता. ऑस्ट्रेलियाने एकाच दिवसात आपले दोन महान दिग्गज गमावले. शुक्रवारी सकाळी माजी यष्टिरक्षक रॉडनी मार्श यांनी जगाचा निरोप घेतला होता. त्यांचाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर संध्याकाळी उशिरा शेन वॉर्नच्या मृत्यूच्या बातमीने ऑस्ट्रेलियासह संपूर्ण क्रिकेट विश्व हादरले.


हेही वाचाः IND vs SL: ऋषभ पंतचा मोहालीमध्ये धुमाकूळ, कोहली 100 व्या कसोटीत शतकापासून दूर, भारत – पहिल्या दिवशी 357/6

First Published on: March 4, 2022 7:47 PM
Exit mobile version