NBA Finals : लॉस अँजेलिस लेकर्सला जेतेपद 

NBA Finals : लॉस अँजेलिस लेकर्सला जेतेपद 

लॉसअँजेलिस लेकर्स 

लॉस अँजेलिस लेकर्स संघाने जगातील सर्वोत्तम बास्केटबॉल स्पर्धा ‘नॅशनल बास्केटबॉल असोसिएशन’चे (एनबीए) जेतेपद पटकावले. या विजयासह त्यांनी बॉस्टन सेल्टिकच्या १७ जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी केली. ‘बेस्ट ऑफ सेव्हन’ अंतिम फेरीत लेकर्स संघाने मियामी हिटचा ४-२ असा पराभव केला. त्यांनी अंतिम फेरीतील रविवारी झालेल्या सहाव्या सामन्यात हिटचा १०६-९३ असा पराभव करत एनबीएचे जेतेपद पटकावले. याआधी लेकर्स संघाने दहा वर्षांपूर्वी ही स्पर्धा जिंकली होती.

यंदाचा एनबीएचा मोसम या स्पर्धेच्या इतिहासात सर्वाधिक काळ चाललेला मोसम ठरला. या मोसमाला २२ ऑक्टोबर २०१९ रोजी सुरुवात झाली होती. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, ही स्पर्धा ११ मार्चपासून चार महिने बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर ३० जुलैपासून ओरलँडोच्या डिस्नी वर्ल्डमध्ये प्रेक्षकांविना उर्वरित स्पर्धा खेळवली गेली. लेकर्स संघाने या मोसमात उत्कृष्ट कामगिरी करत २०१० नंतर पहिल्यांदाच ही स्पर्धा जिंकली. लेकर्सचा स्टार खेळाडू लेब्रॉन जेम्सने अंतिम फेरीतील सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला. एनबीएचे जेतेपद पटकावण्याची लेब्रॉनची ही एकूण चौथी, तर लेकर्सकडून खेळताना पहिलीच वेळ होती. त्याने रविवारच्या सामन्यात २८ गुण, १४ रिबाऊंण्ड्स आणि १० असिस्टची नोंद केली.

 

First Published on: October 13, 2020 1:00 AM
Exit mobile version