महाराष्ट्र सरकारला उशीरा जाग

महाराष्ट्र सरकारला उशीरा जाग

कॉमनवेल्थ गेम्स २०१८

महाराष्ट्र सरकारने यावर्षी एप्रिल महिन्यात पार पडलेल्या गोल्ड कोस्ट २०१८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणाऱ्या महाराष्ट्रातील सात खेळाडूंना ५० लाखचे बक्षीस मंजूर केले आहे. स्पर्धा होऊन जवळजवळ दोन महिने उलटल्यानंतर राज्यसरकारने हे बक्षीस जाहीर केल्याने खेळजगतातून निराशा व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र सरकारने एक ठराव मंजूर केला असून त्यान्वये तेजस्विनी सावंत, हिना सिद्धू , राहुल आवारे, मधुरिका पाटकर, पूजा सहस्रबुद्धे, सनील शेट्टी आणि चिराग शेट्टी यांना प्रत्येकी ५० लाखांचे बक्षिस जाहिर केले आहे. मुळच्या महाराष्ट्राच्या असणाऱ्या या सातही खेळाडूंनी आपआपल्या खेळात सुवर्ण पदक पटकावले आहे. तर यासोबतच तेजस्विनी, हिना आणि चिराग शेट्टी यांनी रौप्य पदकही पटकावले असल्याने त्यांना प्रत्येकी ३०लाख रुपयेही देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्राकडून अप्रतिम कामगिरी

तेजस्विनी सावंतने ५० मीटर रायफल 3 पी स्पर्धेत सुवर्णपदक तर ५० मीटर रायफल प्रोन स्पर्धेत रौप्यपदक पटकावले आहे.हिना सिद्धूने २५ मीटर पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले तर १० मीटर एयर पिस्तूल स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे. चिराग शेट्टीने बॅडमिंटन स्पर्धेत सुवर्णपदक आणि सांघिक बॅडमिंटन स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आहे.
सनील शेट्टीने टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक तर दुहेरी टेबल टेनिस स्पर्धेत कांस्यपदक पटकावले आहे. त्यामुळे त्याला ५० लाखांसोबतच कांस्यपदकासाठी २० लाख रुपयांचे बक्षिस देखील मिळणार आहे. या सर्वांसह राहुल आवारेने कुस्तीत तर मधुरिका पाटकर, पूजा सहस्रबुद्धे या दोघींनी टेबल टेनिस स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले आहे.

 

तेजस्विनी सावंत

भारताचा कॉमनवेल्थमध्ये तिसरा नंबर 

एप्रिल महिन्यात ऑस्ट्रेलियात पार पडलेल्या गोल्ड कोस्ट २०१८ कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताने कमालीची कामगिरी करत तब्बल ६६ पदक मिळवली आहेत. ज्यात २६ सुवर्णपदक, २० रौप्यपदक आणि २० कांस्यपदकाचा समावेश आहे. स्पर्धेत १९८ पदकांसह ऑस्ट्रेलियाने पहिले तर १३६ पदकांसह इंग्लंडने दुसरे स्थान पटकावले आहे.

 

 

First Published on: June 28, 2018 8:17 PM
Exit mobile version