न्यू इंडिया एशोरन्स, मुंबई बंदर बाद फेरीत

न्यू इंडिया एशोरन्स, मुंबई बंदर बाद फेरीत

कबड्डी

न्यू इंडिया एशोरन्स, मुंबई बंदर, बँक ऑफ बडोदा या संघांनी महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित रौप्यमहोत्सवी शहरी पुरुष व्यावसायिक गट कबड्डी स्पर्धेच्या बाद फेरीत प्रवेश केला. बँक ऑफ बडोदाने चुरशीच्या लढतीत महाराष्ट्र बँकेचा २३-२१ असा पराभव करत ब गटात अग्रक्रम मिळवला. मध्यंतराला बँक ऑफ बडोदाकडे १७-११ अशी भक्कम आघाडी होती. त्यांनी उत्तरार्धातही चांगला खेळ सुरु ठेवत हा सामना जिंकला. या गटात उपविजेतेपद मिळवत महाराष्ट्र बँकेनेही बाद फेरी गाठली.

अ गटात मुंबई बंदरने महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाचा ४७-१२ असा धुव्वा उडवत बाद फेरीत प्रवेश केला. शुभम कुंभार, स्वप्नील पाटील यांच्या दमदार खेळाला या विजयाचे श्रेय जाते. क गटात न्यू इंडिया एशोरन्सने शिवडीच्या भारत पेट्रोलियमवर ४१-२५ अशी मात केली. कुलदीप माहिल, केतन कळवनकर यांच्या चांगल्या खेळामुळे मध्यंतराला न्यू इंडिया एशोरन्सकडे ३१-६ अशी आघाडी होती.

महिलांत जे.जे.हॉस्पिटल विजयी

महिलांच्या इ गटात जे.जे.हॉस्पिटलने स्नेहविकासला ३९-२० असे पराभूत केले. पूर्वार्धात १८-१० अशी आघाडी घेणार्‍या जे.जे.हॉस्पिटलकडून वैष्णवी चव्हाण, सविता कावळे उत्तम खेळल्या. क गटात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरणने युवक ग्रामीण मंडळाचा ३७-१८ असा पराभव केला. अ गटात नाशिकच्या रचना स्पोर्ट्सने महात्मा फुलेला ४३-९ असे नमवत आगेकूच केली. तसेच ठाणे मनपा, अमरहिंद आणि स्वस्तिक मंडळालाही आपापले सामने जिंकण्यात यश आले.

First Published on: February 16, 2020 5:28 AM
Exit mobile version