MS Dhoni : निवृत्तीच्या पोस्टमध्ये महेंद्रसिंह धोनीनं लिहिला फक्त दोन ओळींचा संदेश!

MS Dhoni : निवृत्तीच्या पोस्टमध्ये महेंद्रसिंह धोनीनं लिहिला फक्त दोन ओळींचा संदेश!

कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीने आपल्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला आहे. तो इथून पुढे फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसणार आहे. मात्र, भारताच्या ब्लू जर्सीमध्ये धोनीला पाहण्याचा योग आता पुन्हा येणार नाहीये. महेंद्र सिंह धोनीने आज संध्याकाळी साडेसातच्या सुमारास आपल्या निवृत्तीची घोषणा केली. आजपर्यंत भारताच्या अनेक दिग्गज खेळाडूंना निवृत्तीसाठी एक योग्य प्रकारचा सेंडऑफ देण्यात आला होता. त्यासाठी त्यांच्या चाहत्यांना आणि टीममधील इतर खेळाडूंना पुरेसा कालावधीही मिळाला होता. महान खेळाडू सचिन तेंडुलकरला देखील शेवटची मॅच खेळताना पाहण्याची संधी त्याच्या चाहत्यांना मिळाली होती. मात्र, महेंद्रसिंह धोनीने त्याच्या चाहत्यांना ती संधी देखील दिलेली नाही. आपल्या निवृत्तीच्या संदेशामध्ये धोनीने फक्त दोन ओळी लिहिल्या आहेत. आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर धोनीने हा संदेश टाकला आहे.

काय म्हणाला धोनी निवृत्तीच्या संदेशात?

धोनी आपल्या निवृत्तीच्या संदेशात म्हणतो, ‘आजपर्यंत तुम्ही दिलेला पाठिंबा आणि प्रेमासाठी धन्यवाद. आज संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटांपासून मला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त समजण्यात यावं’, इतकाच मेसेज धोनीने आपल्या पोस्टमध्ये टाकला आहे. धोनीने अचानक हा निर्णय का घेतला? शेवटच्या सामन्याची संधी देखील त्याच्या चाहत्यांना का दिली नाही? निवृत्तीच्या संदेशामध्ये फक्त २ ओळीच का टाकल्या? हे प्रश्न त्याच्या या २ ओळींच्या संदेशामुळे अनुत्तरीत राहिले असून आता धोनी जेव्हा जाहीरपणे या संदेशाविषयी बोलेल, तेव्हाच त्याविषयी अधिक खुलासा होऊ शकेल.

First Published on: August 15, 2020 8:36 PM
Exit mobile version