सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्ताने सुनील गावसकरांचे खास पत्र

सचिन तेंडुलकरच्या वाढदिवसानिमित्ताने सुनील गावसकरांचे खास पत्र

मुंबई | मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) याचा आज ५० वा वाढदिवस आहे. सचिनच्या वाढदिवसानिमित्ताने माजी क्रिकेटर सुनील गावसकर (Sunil Gavaskar) यांनी खास पत्र लिहिले आहे. या पत्रातून सुनील गावसकर यांनी सचिनची जुनी आठवण सांगितली आहे.  “१९८६-८७चा काळ असा होता, यात मुंबईतील कोणतेही वर्तमानपत्र उगडले की सतत सचिन तेंडुलकर-विनोद कांबळीची नावे वाचायला मिळायची. मला आठवते की, मी १९८७ मध्ये बायसेंटेनरी कसोटी सामना खेळण्यासाठी इंग्लंडला जात होतो. तेव्हा माझ्या गाडीत हेमंत वायंगणकर आणि अनिल जोशी होते.

मी सचिनबद्दल वर्तमान पत्रात वाचले होते. पण, अनिल आणि हेमंतने सचिनला खेळताना बघितले होते. हे दोघेही मला सांगत होते की, विनोद कांबळी ही उत्तम फलंदाज आहे. पण, सचिनमध्ये नक्कीच काही तरी खास आहे. ऐवढ्यात हेमंत वायंगणकर म्हणाले, सचिन थोडा नाराज आहे. कारण, सचिनला मुंबई क्रिकेट संघटनेचा त्या वर्षीचा सर्वोत्तम ज्युनियर खेळाडू म्हणून पुरस्कार मिळाला नव्हता. मला हे ऐकून हसू आले विमानतळावर आत जाण्याआधी मी माझ्या बॅगेतून माझे लेटरहेड काढले आणि कारच्या बॉनेटवर कागद ठेवून सचिनकरिता एक चिठ्ठी लिहिली.

या चिठ्ठीत मी सचिनला लिहिले होते की, तुला नाराज होण्याची गरज नाही. कारण, अजून एका खेळाडूलाही हे बक्षीस दिले गेले नाही. आणि क्रिकेटर म्हणून त्यांची कामगिरी वाईट नाही, असे मी पत्रात लिहून मी माझे एक जुने पॅडचे पेअर सचिनला भेट म्हणून हेमंत आणि अनिल जोशीच्या हस्ते पाठविले होते. मला त्या कमी वजनाच्या पॅडचा खूप उपयोग होत होता. कारण, क्रिकेटच्या धावा जमा करायचे माझे हे तंत्र एकेरी धावा पळून काढण्यावर होते. मी सचिनला म्हणालो, तू तर जोरदार चौकार मारत असतो. तुला या कमी वजनाच्या पॅडची गरज नाही.

यानंतर हेमंत आणि अनिल जोशीबरोबर आम्ही पारसी जिमखान, इस्लाम जिमखाना, पीजे हिंदू जिमखाना मैदानावरच्या सचिन-विनोदच्या मॅचेस गाडी रस्त्याच्या कडेला लावून बघत असायचो. एकदा गंमत झाली की, आम्ही माझ्या नवीन मारुती कारमध्ये बसून क्रिकेटचा सामना बघत होतो. त्यावेळी मारुती कार नुकत्याच दिसू लागल्याने लोक देखील उत्सुक होत होती. यावेळी सचिनने मारलेला सिक्सर आमच्या कारवरून गेला. मनात माझ्या चर्रर्र झाले की, नवीन कारवर चेंडू लागला असता तर आमच्या गाडीला दुखापत झाली असती.

First Published on: April 24, 2023 9:53 AM
Exit mobile version