लंबी रेस का घोडा!

लंबी रेस का घोडा!

मयांक

‘ज्या इमारतीचा पाया मजबूत असतो, ती इमारत ढासळण्याची शक्यता कमी असते’, असे म्हटले जाते. हे खेळ आणि खेळाडूंनाही लागू पडते असे म्हणणे वावगे ठरू नये. एखाद्या क्रिकेटपटूला बरीच वर्षे स्थानिक क्रिकेट खेळल्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर संधी मिळते, तेव्हा त्या संधीचे महत्त्व त्याला माहित असते. या संधीचे सोने करण्यासाठी तो पूर्णपणे तयार असतो. याचेच एक उत्तम उदाहरण म्हणजे भारतीय संघाचा सलामीवीर मयांक अगरवाल. २०१० मध्ये स्थानिक क्रिकेट खेळण्यास सुरुवात करणार्‍या मयांकला देशाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली ती २०१८ मध्ये. या आठ वर्षांत त्याला अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला. मात्र, या अनुभवाचा मयांकला आता फायदा होत आहे. इंदूर येथे झालेल्या बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीत मयांकने २४३ धावांची खेळी केली. अवघा आठवा कसोटी सामना खेळणार्‍या मयांकचे हे दुसरे द्विशतक होते. इतक्या कमी काळात त्याने आपले वेगळे नाव बनवले आहे. मात्र, तो इथपर्यंत पोहोचण्यामागे बरीच मेहनत आहे.

मयांकची पहिल्यांदा भारतीय क्रिकेट चाहत्यांना ओळख झाली ती २०१० च्या १९ वर्षांखालील वर्ल्डकप स्पर्धेत! भारताला या स्पर्धेत विशेष कामगिरी करता आली नाही. मात्र, मयांकने भारताकडून ६ सामन्यांत सर्वाधिक १६७ धावा काढल्या. त्यामुळे त्याला कर्नाटकाच्या संघातून स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्याची संधी मिळाली. सुरुवातीची तीन वर्षे केवळ मर्यादित षटकांचे क्रिकेट खेळणार्‍या मयांकला सातत्यपूर्ण कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला रणजी क्रिकेट खेळण्यासाठी २०१३-१४ च्या मोसमापर्यंत वाट पाहावी लागली. परंतु, निराशाजनक कामगिरीमुळे त्याला संघातून आत-बाहेर व्हावे लागले. एकीकडे मयांकला सातत्याने अपयश येत असताना दुसरीकडे लोकेश राहुल, मनीष पांडे, करुण नायर यांसारखे त्याचे कर्नाटक संघातील सहकारी दमदार खेळ करत भारतीय संघाचे दार ठोठावत होते. या गोष्टीचा मयांकवर सकारात्मक परिणाम झाला. त्याने आपल्या खेळावर आणि फिटनेसवर खूप मेहनत घेतली.

अखेर २०१७-१८ मोसम हा मयांकच्या कारकिर्दीला कलाटणी देणारा ठरला. या मोसमात त्याने स्थानिक क्रिकेटमध्ये ३६ डावांत २२५३ धावा चोपून काढल्या. रणजीमध्ये त्याने ८ सामन्यांत १०५.४५ सरासरीने ११६० धावा फटकावल्या, ज्यात तब्बल ५ शतकांचा समावेश होता. या मोसमात एक हजार धावांचा टप्पा पार करणारा तो एकमेव फलंदाज होता. त्याने महाराष्ट्राविरुद्ध नाबाद ३०४ धावांची खेळीही केली. तसेच त्याने विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धेच्या ८ सामन्यांत ९०.३७ च्या सरासरीने ७२३ धावा, तर सय्यद मुश्ताक अली करंडक टी-२० स्पर्धेत १४५ च्या स्ट्राईक रेटने २५८ धावा केल्या. या कामगिरीमुळे त्याची इंग्लंड दौर्‍यासाठी भारत ’अ’ संघात निवड झाली. या दौर्‍यात त्याने २ शतकांची नोंद केली. पुढे त्याने दक्षिण आफ्रिका ’अ’ संघाविरुद्ध द्विशतकही झळकावले. इतकी सातत्यपूर्ण कामगिरी केल्यानंतर भारताच्या निवड समितीला मयांकला संघाबाहेर ठेवणे अवघड जाणार होते आणि तसेच झाले.

सप्टेंबर २०१८ मध्ये पाहुण्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी मयांकला पहिल्यांदा भारतीय संघात स्थान मिळाले. मात्र, या मालिकेत लोकेश राहुलसोबत युवा पृथ्वी शॉला सलामीवीर म्हणून खेळण्याची संधी मिळाली. पृथ्वीने पदार्पणाच्या मालिकेतच एक शतक आणि एक अर्धशतक झळकावले. या मालिकेनंतर झालेल्या ऑस्ट्रेलियन दौर्‍यासाठी मयांकला संघात स्थान मिळाले नाही. मात्र, सराव सामन्यात पृथ्वीला दुखापत झाल्याने मयांकसाठी पुन्हा भारतीय संघाची दारे खुली झाली. तो ज्या संधीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहत होता, ती संधी अखेर त्याला मेलबर्न येथे झालेल्या ’बॉक्सिंग-डे टेस्ट’मध्ये मिळाली.

कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करताना मयांकने मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, जॉश हेझलवूड आणि नेथन लायन या चौकडीचा निकराने सामना करत पहिल्याच डावात ७६ धावांची खेळी केली. पुढच्या दोन डावांमध्ये त्याने ४२ आणि ७७ धावा काढताना सर्वांनाच प्रभावित केले. भारताने या दौर्‍यात पहिल्यांदा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकली आणि संघाच्या या यशात मयांकने महत्त्वाचे योगदान दिले. मयांक हा ’लंबी रेस का घोडा आहे’, हे कळण्यासाठी अवघे तीन डाव पुरेसे होते. त्यानंतर वेस्ट इंडिज दौर्‍यात मयांकला छाप पाडता आली नाही. मात्र, त्याने पहिल्यांदा भारतात कसोटी क्रिकेट खेळताना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ सामन्यांच्या ४ डावांमध्ये ८५ च्या सरासरीने ३४० धावा काढल्या. याच मालिकेत त्याने कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक झळकावले आणि त्याचे द्विशतकात रूपांतर केले. त्याने आपला फॉर्म कायम राखताना बांगलादेशच्या गोलंदाजांनाही चांगलाच घाम गाळायला लावला. कर्नाटकाला गुंडप्पा विश्वनाथपासून ते राहुल द्रविडपर्यंत महान फलंदाजांचा वारसा आहे. मयांकने आताच आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आहे. परंतु, त्याने पुढेही दमदार कामगिरी सुरु ठेवली तर कर्नाटकाने भारताला दिलेल्या महान फलंदाजांच्या यादीत आणखी एका नावाचा समावेश करावा लागेल हे निश्चित.

पहिल्या शतकाचे द्विशतकात रूपांतर करणारा चौथा भारतीय! 
मयांक अगरवालने विशाखापट्टणम येथे मागील महिन्यात झालेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या कसोटीत २१५ धावा केल्या होत्या. हे त्याचे कसोटी क्रिकेटमधील पहिले शतक होते. आपल्या पहिल्याच शतकाचे द्विशतकात रूपांतर करणारा मयांक भारताचा चौथा फलंदाज ठरला. मयांकच्या आधी हा पराक्रम दिलीप सरदेसाई (नाबाद २००), विनोद कांबळी (२२४) आणि करुण नायर (नाबाद ३०३) यांनी केला होता.

१२ डाव, २ द्विशतके!
मयांक अगरवालने बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या कसोटीच्या पहिल्या डावात २४३ धावांची खेळी केली. हे त्याचे अवघ्या १२ कसोटी डावांतील दुसरे द्विशतक होते. कसोटीत सर्वात कमी डावांत दोन द्विशतके करणार्‍या भारतीय फलंदाजांमध्ये मयांकचा दुसरा क्रमांक लागतो. या यादीत अव्वल स्थानी असणार्‍या विनोद कांबळीने अवघ्या ५ डावांमध्येच दोन द्विशतके झळकावली होती. तसेच मयांकने ही कामगिरी करताना ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकले. ब्रॅडमन यांनी कसोटीत दोन द्विशतके लगावण्यासाठी १३ डाव घेतले होते.

First Published on: November 17, 2019 5:01 AM
Exit mobile version