आयपीएल पुढे गेल्याने मला फिट होण्यासाठी वेळ मिळाला!

आयपीएल पुढे गेल्याने मला फिट होण्यासाठी वेळ मिळाला!

दीपक चहरचे विधान

करोनाच्या पार्श्वभूमीवर जगातील सर्वच स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. जगातील सर्वात मोठी टी-२० स्पर्धा इंडियन प्रीमियर लीगही (आयपीएल) याला अपवाद नाही. बीसीसीआयने आयपीएल १५ एप्रिलपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता आणि याचा चेन्नई सुपर किंग्स (सीएसके) संघाचा प्रमुख वेगवान गोलंदाज दीपक चहरला फायदा झाला आहे. दीपकला मागील वर्षी डिसेंबरमध्ये पाठीची दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला मैदानाबाहेर राहावे लागले आहे. आयपीएल पुढे गेल्याने दीपकला फिट होण्यासाठी अधिक मिळाला आहे.

मी पुन्हा गोलंदाजी करण्यास उत्सुक आहे. सध्या मी फक्त फिट राहण्याचा प्रयत्न करत आहे. जेव्हा गोष्टींवर तुमचे नियंत्रण नसते, तेव्हा तुम्ही फार काही करु शकत नाही. त्यामुळे मी सध्या केवळ ज्या गोष्टींवर माझे नियंत्रण आहे, त्या करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे. मी नवीन काहीतरी शिकण्याचा प्रयत्न करत आहे. मला दुखापत झाली होती आणि मी त्यातून सावरत आहे. त्यामुळे मी फिटनेसवर जास्तीजास्त लक्ष देत आहे. आयपीएलचा मोसम ठरल्यावेळीच सुरु झाला असता, तर मला सुरुवातीचे काही सामने मुकावे लागले असते. परंतु, आयपीएल पुढे गेल्याने मला फिट होण्यासाठी वेळ मिळाला आहे, असे दीपक म्हणाला.

दीपकने मागील काही मोसमांमध्ये चेन्नईकडून खेळताना चांगली कामगिरी केली आहे. त्याने मागील दोन मोसमांत २९ सामन्यांत ३२ गडी बाद केले. या कामगिरीच्या आधारावर त्याची भारतीय संघातही निवड झाली. त्याने मागील वर्षी बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सामन्यात ७ धावांत ६ बळी घेतले होते, ज्यात हॅटट्रिकचाही समावेश होता. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये कोणत्याही गोलंदाजाने केलेली ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्यामुळे तो पूर्णपणे फिट होऊन या आयपीएल मोसमातही पहिल्या सामान्यापासून दमदार कामगिरी करेल अशी चेन्नईला आशा आहे.

वेळेचा सदुपयोग करा!
करोनाचा प्रादुर्भाव वाढत असून आतापर्यंत जगात ८० हजारांहून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत. त्यामुळे भारतासह जवळपास सर्वच देशांत लॉकडाऊन करण्यात आले आहे. लोकांना घरातच राहावे लागत आहे. आता हा जो वेळ मिळाला आहे, त्याचा सदुपयोग करुन आपण नवीन काहीतरी शिकले पाहिजे, असे दीपक चहरला वाटते. सध्याचा काळ आपल्या सर्वांसाठीच अवघड आहे. सर्वकाही थांबले आहे. अनेकांचा रोजगार गेला. मात्र, सध्या सर्वांनी सुरक्षित असणे जास्त महत्त्वाचे आहे. तुम्हाला आता वेळ मिळाला आहे, तर नवीन काहीतरी शिका. सकारात्मक राहा, असे चहर म्हणाला.

First Published on: April 9, 2020 5:22 AM
Exit mobile version