महेंद्रसिंग धोनी निकालांचा फारसा विचार करत नव्हता – व्ही.व्ही.एस लक्ष्मण

महेंद्रसिंग धोनी निकालांचा फारसा विचार करत नव्हता – व्ही.व्ही.एस लक्ष्मण

व्ही.व्ही.एस लक्ष्मण आणि महेंद्रसिंग धोनी

महेंद्रसिंग धोनी निकालांचा फारसा विचार करत नव्हता आणि हे त्याच्या यशामागचे महत्त्वाचे कारण आहे, असे मत भारताचा माजी फलंदाज व्ही.व्ही.एस लक्ष्मणने व्यक्त केले. धोनीने नुकतीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनी एका वर्षाहूनही जास्त काळ क्रिकेट खेळला नव्हता. परंतु, त्याचे भारतीय संघात पुनरागमन अजूनही शक्य आहे असे म्हटले जात होते. मात्र, १५ ऑगस्टला त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती स्वीकारली. आता धोनी पुन्हा भारतासाठी खेळणार नसला, तरी त्याचे भारतीय क्रिकेटला असलेले योगदान कधीही विसरता येणार नाही, असे लक्ष्मणला वाटते.

त्याच्याकडून असंख्य भारतीयांना प्रेरणा मिळते

भारतीय क्रिकेट संघाकडून सर्वांनाच खूप अपेक्षा असतात. त्यामुळे भारतीय संघाचे नेतृत्व करणे हे कोणत्याही क्रिकेटपटूसमोरील सर्वात मोठे आव्हान असते. कर्णधार म्हणून धोनी इतका यशस्वी झाला, कारण तो निकालांचा कधीच फार विचार करत नव्हता. त्याच्याकडून असंख्य भारतीयांना प्रेरणा मिळते. आपल्या देशाचे आपण कसे प्रतिनिधित्व केले पाहिजे, लोकांमध्ये वावरताना आपण कसे वागले-बोलले पाहिजे, याचा उत्तम आदर्श धोनीने लोकांसमोर ठेवला आहे, असे लक्ष्मणने सांगितले.

लोक धोनीचा खूप आदर करतात

तुम्ही क्रिकेटमध्ये किती यश मिळवता, यावर तुम्हाला क्रिकेट चाहत्यांचे किती प्रेम मिळणार हे ठरते. मात्र, तुमचा मैदानात आणि मैदानाबाहेरील वावर, तुम्हाला किती आदर मिळणार हे ठरवतो. धोनीने निवृत्तीची घोषणा केल्यानंतर केवळ क्रिकेट चाहते आणि आजी-माजी खेळाडूंनीच नाही, तर नेते, अभिनेते, व्यावसायिक अशा सर्वांनीच धोनीचे त्याच्या क्रिकेटला असलेल्या योगदानाबद्दल आभार मानले. लोक त्याचा किती आदर करतात हे यावरुन कळते, असेही लक्ष्मणने नमूद केले.


धोनीला निरोपाचा सामना द्यायची बीसीसीआयची तयारी

धोनीने इंस्टाग्रामच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र, धोनीसारख्या खेळाडूने मैदानातूनच निवृत्ती घेतली पाहिजे, असे अनेकांना वाटत आहे. धोनीला निरोपाचा सामना द्यायची आता बीसीसीआयनेही तयारी दर्शवली आहे. याबाबत बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आयपीएल स्पर्धा झाल्यावर आम्ही आंतरराष्ट्रीय मालिका आयोजित करू शकतो. धोनीचे भारताला व भारतीय क्रिकेटला खूप मोठे योगदान आहे आणि आम्हाला त्याचा खूप आदर आहे. धोनीसाठी निरोपाचा सामना असायला हवा असे आम्हाला नेहमीच वाटत होते, पण धोनी हा वेगळाच खेळाडू आहे. तो आता निवृत्ती घेईल याची कोणाला अपेक्षा नव्हती.


First Published on: August 20, 2020 1:30 AM
Exit mobile version