IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी दमदार कामगिरीसाठी सज्ज – स्टिफन फ्लेमिंग 

IPL 2020 : महेंद्रसिंग धोनी दमदार कामगिरीसाठी सज्ज – स्टिफन फ्लेमिंग 

स्टिफन फ्लेमिंग आणि महेंद्रसिंग धोनी  

चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी मागील वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या एकदिवसीय विश्वचषकानंतर क्रिकेट खेळलेला नाही. धोनी काही भारतीय संघाच्या बाहेर होता, पण तो संघात पुनरागमन करेल अशी चाहत्यांना आशा होती. मात्र, त्याने मागील महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्यामुळे चाहते निराश झाले. मात्र, शनिवारपासून सुरु होणाऱ्या आयपीएल स्पर्धेत तो खेळताना दिसणार आहे. या स्पर्धेत तो चेन्नईचे नेतृत्व करेल. धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरीत्याच्यात अजून बरेच क्रिकेट शिल्लक असून तो यंदाच्या आयपीएल स्पर्धेत तो दमदार कामगिरी करण्यास सज्ज असल्याचे चेन्नईचे प्रशिक्षक स्टिफन फ्लेमिंग यांनी सांगितले.

धोनीने कसून सराव केला 

धोनी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या खूप फिट आहे. त्याने आयपीएलसाठी कसून सराव केला असून यंदाच्या स्पर्धेत तो दमदार कामगिरी करण्यास सज्ज आहे. धोनी बराच काळ क्रिकेट खेळलेला नाही. परंतु, बरेचदा अनुभवी खेळाडूंनासाठी ही विश्रांती कामी येऊ शकते. धोनी आता फिट आहे. त्याला फारसा ताण जाणवत नाही आणि तो आयपीएल स्पर्धेत खेळण्यास खूप उत्सुक आहे, असे फ्लेमिंग यांनी सांगितले.

अनुभव ठरेल फायदेशीर 

चेन्नईच्या संघात ३९ वर्षीय धोनीसह शेन वॉटसन, ब्राव्हो, केदार जाधव, इम्रान ताहिर यांसारख्या खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांचे वय ३५ वर्षांहून अधिक आहे. या सर्व खेळाडूंचा अनुभव या स्पर्धेत कामी येईल असे फ्लेमिंग यांना वाटते. अनुभवी खेळाडू संघात असणे कधीही फायदेशीर असते. या खेळाडूंना कोणत्या क्षणी कसे खेळायचे हे ठाऊक असते. ते दबाव योग्यप्रकारे हाताळू शकतात, तसेच त्यांच्यात सामना आपल्या संघाच्या दिशेने फिरवण्याची क्षमता असते. त्यामुळेच अनुभवाला इतके महत्त्व दिले जाते. आमच्या संघात बऱ्याच अनुभवी खेळाडूंचा समावेश असल्याचे फ्लेमिंग म्हणाले.

First Published on: September 18, 2020 10:15 PM
Exit mobile version