धोनी लॉकडाऊनमध्ये असा घालवतोय वेळ

धोनी लॉकडाऊनमध्ये असा घालवतोय वेळ

कोरोना विषाणूमुळे सारं जग थांबलं आहे. सर्व क्रिकेट आणि इतर क्रिडा विश्वाला ब्रेक लागला आहे. टोकियो ऑलिम्पिक एक वर्षासाठी तहकूब करण्यात आली आहे. आयपीएल २०२० स्पर्धा देखील अनिश्चित काळासाठी तहकूब करण्यात आली आहे. यावर्षी ऑक्टोबरमध्ये होणारा टी-२० वर्ल्ड कपदेखील धोक्यात आला आहे. या सगळ्यात महेंद्रसिंग धोनी चर्चेचा विषय राहिला आहे. धोनीच्या भविष्याबद्दल बर्‍याच गोष्टी बोलल्या जात आहेत पण सर्वांपासून दूर असलेला ‘कॅप्टन कूल’ आपली मुलगी जीवाबरोबर रांचीमध्ये किमती वेळ घालवत आहे. धोनी आणि जीवाचा एक नवीन व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

आयसीसी विश्वचषक २०१९ मध्ये धोनीने उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध अखेरचा सामना खेळला होता. या सामन्यात भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं. त्यानंतर धोनी क्रिकेट खेळलेला नाही. असं म्हटलं जात होतं की धोनी आयपीएलमध्ये पुनरागमन करेल आणि आयपीएलमधील कामगिरी त्याचं भविष्य ठरवेल. आता कोरोना विषाणूमुळे आयपीएल स्पर्धा पुढे ढकलण्यात आली आहे, धोनीच्या भविष्याविषयी बरेच अंदाज बांधले जात आहेत. दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या अधिकृत इंस्टाग्राम पेजवरून धोनीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे.

#WhistlePodu ?? VC: @sakshisingh_r @mahi7781

A post shared by Chennai Super Kings (@chennaiipl) on

या व्हिडिओमध्ये धोनी आपल्या रांचीमधील फार्महाऊसच्या बागेत आपली मुलगी जीवा आणि पाळीव कुत्र्यासह दिसला आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की धोनी आपली मुलगी जीवाला पाळीव कुत्र्यास कसं प्रशिक्षण द्यायचं हे सांगत आहे. जिवाजवळ एक बॉल आहे, जो ती वारंवार आकाशात उडवत आहे आणि पाळीव कुत्रा चेंडूला पकडत आहे.


हेही वाचा – गंभीर म्हणतो ‘या’ खेळाडूसाठी जीवही देईन


महेंद्रसिंग धोनी सोशल मीडियावर फारसा अ‍ॅक्टिव नाही. अशा परिस्थितीत त्यांच्या चाहत्यांना त्याच्याविषयी माहिती सहज मिळत नाहीत. त्याची पत्नी साक्षी धोनी सोशल मीडियावर बरीच अ‍ॅक्टिव असते आणि बर्‍याचदा धोनी आणि जीवाचे व्हिडिओ आणि छायाचित्रे शेअर करते. साक्षीच्या पोस्टवरून चाहत्यांकडून धोनीबद्दल माहिती मिळत असते.

 

First Published on: May 6, 2020 3:26 PM
Exit mobile version