चांगला फिनिशर होण्यासाठी धोनी थाय पॅडवर ‘हे’ लिहायचा!

चांगला फिनिशर होण्यासाठी धोनी थाय पॅडवर ‘हे’ लिहायचा!

महेंद्रसिंग धोनी

भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा क्रिकेटच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट फिनिशर्सपैकी एक मानला जातो. त्याने भारतीय संघ, तसेच आयपीएल संघ चेन्नई सुपर किंग्सला अनेकदा अशक्यप्राय वाटणारे विजय मिळवून दिले आहे. कारकिर्दीच्या सुरुवातीला धोनी सलामीवीर म्हणून किंवा तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. त्याने तिसऱ्या क्रमांकावर खेळताना श्रीलंकेविरुद्ध नाबाद १८३ धावांची, तर पाकिस्तानविरुद्ध १४८ धावांची खेळीही केली होती. मात्र, भारताला फिनिशरची कमतरता भासत असल्याने त्याने खालच्या क्रमांकावर खेळण्याचा निर्णय घेतला. परंतु, भारताचे माजी क्रिकेटपटू संजय बांगरच्या मते धोनीसाठी हा बदल सोपा नव्हता.

नैसर्गिक खेळात बदल करावा लागला

सुरुवातीच्या काळात धोनी आक्रमक शैलीत फलंदाजी करायचा. अगदी सहज मोठे फटके मारायचा. मात्र, चांगला फिनिशर होण्यासाठी त्याला त्याच्या नैसर्गिक खेळात थोडा बदल करावा लागला. तो त्याच्या थाय पॅडवर ‘१, २ टीक, टीक आणि ४, ६ क्रॉस, क्रॉस’ असे लिहायचा. म्हणजेच चौकार, षटकार मारण्यापेक्षा मला एक, दोन धावांवर भर द्यायचा आहे, असे त्याने लिहिले होते. त्यामुळे प्रत्येक वेळी फलंदाजीला जाताना, त्याची थाय पॅडवर नजर जात असे. त्यावर लिहिलेली सूचना वाचून आपल्याला काय करायचे आहे, याची धोनीला आठवण व्हायची. या प्रक्रियेमुळेच तो इतका उत्कृष्ट फिनिशर बनला, असे बांगर यांनी सांगितले.

धोनी, बेवनमध्ये एक साम्य

बहुतांश फिनिशर्सना एक, दोन धावांचे महत्त्व कळले आहे. धोनी, मायकल बेवन याची उत्तम उदाहरणे आहेत. या दोघांमध्ये एक साम्य आहे. ते एक, दोन धावांवर भर द्यायचे आणि त्यामुळे ते आपल्या संघाला सामने जिंकवून द्यायचे. चौकार आणि षटकार मारून तुम्ही सामने जिंकू शकत नाही हे या दोघांना समजले होते, असेही बांगर म्हणाले.

 

First Published on: October 20, 2020 6:09 PM
Exit mobile version