अभिनव स्पोर्ट्स, सूर्यकांत व्यायामशाळेची आगेकूच

अभिनव स्पोर्ट्स, सूर्यकांत व्यायामशाळेची आगेकूच

अभिनव स्पोर्ट्स, सूर्यकांत व्यायामशाळा, लालबाग स्पोर्ट्स, नवनाथ मंडळ, खडा हनुमान मंडळ यांनी मुंबई शहर कबड्डी असोसिएशन आयोजित पुरुष तृतीय श्रेणी गट कबड्डी स्पर्धेच्या चौथ्या फेरीत धडक मारली आहे. वडाळा येथील भारतीय क्रीडा मंदिराच्या पटांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेच्या तिसर्‍या फेरीत अभिनव स्पोर्ट्सने बाबरशेख क्रीडा मंडळाचा चुरशीच्या लढतीत २६-२४ असा पराभव करत आगेकूच केली.

या सामन्याच्या पूर्वार्धात १६-१२ अशी आघाडी घेणार्‍या अभिनवने उत्तरार्धात सावध खेळ करत आपला विजय निश्चित केला. गौरव रेवाळे, महेश पांचाळ यांच्या चांगल्या चढाया आणि सोहम लेपकरच्या भक्कम बचावाच्या खेळाच्या जोरावर अभिनवने हा विजय मिळवला. बाबरशेखच्या सचिन गझने, सचिन राऊत यांनी चांगला प्रतिकार केला, पण त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.

दुसरीकडे सूर्यकांत व्यायामशाळेने ज्ञानेश्वर मंडळाचा ३८-२७ असा सहज पराभव केला. मंदार ठोंबरे, शुभम पवारच्या आक्रमक चढाया आणि प्रतीक मांडवकर, तेजस मालपच्या पकडी यांच्या बळावर सूर्यकांत मंडळाने हा विजय साकारला. लालबाग स्पोर्ट्सने मुंबई शारीरिक शिक्षण मंडळावर ३१-२५ असा विजय मिळवला. या सामन्याच्या मध्यंतराला लालबाग स्पोर्ट्सचा संघ ११-१२ असा पिछाडीवर होता. त्यांच्यकडून विशाल पाठक, आशिष ठाकूर यांनी उत्तम खेळ केला.

नवनाथ क्रीडा मंडळाने रणझुंजार क्रीडा मंडळाचे कडवे आव्हान ३६-३४ असे संपवले. आकाश पवार, प्रितेश घाग यांनी अप्रतिम सुरुवात करत रणझुंजारला मध्यंतराला १९-१२ अशी ७ गुणांची आघाडी मिळवून दिली होती. मात्र, शुभम घाटगे, निलेश रामाणे, लालबाग स्पोर्ट्स यांच्या खेळामुळे नवनाथने दमदार पुनरागमन करत हा सामना जिंकला. तसेच खडा हनुमान सेवा मंडळाने कृष्णामाई क्रीडा मंडळाला २६-२० असे नमवत आपली विजयी घोडदौड सुरू ठेवली. त्यांच्यकडून मेहुल पाटील, तन्मय शेवाळे चांगले खेळले.

इतर निकाल – १) यश क्रीडा मंडळ विजयी वि. अशोक मंडळ (४२-१२), २) साई स्पोर्ट्स विजयी वि. भैरेश्वर क्रीडा मंडळ (३७-२२), ३) प्रगती मंडळ विजयी वि. यंग उमरखाडी (३४-२३), ४) महापुरुष माघी गणेश विजयी वि. विजय हनुमान (२६-२२).

First Published on: October 16, 2019 5:41 AM
Exit mobile version