मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन कॅरम स्पर्धा

मुंबई डिस्ट्रीक्ट गुणांकन कॅरम स्पर्धा

संदिप देवरुखकर, संगीता चांदोरकर अजिंक्य

द. बॉम्बे यंग मेन्स ख्रिश्चन असोसिएशन आयोजित मुंबई डिस्ट्रीक्ट कॅरम गुणांकन स्पर्धेच्या पुरुष एकेरीमध्ये ओ.एन.जी.सी.च्या संदिप देवरुखकरने तर महिला एकेरीमध्ये माजी राज्य आणि राष्ट्रीय विजेती रिझर्व्ह बँकेच्या संगीता चांदोरकरने विजेतेपदाला गवसणी घातली.

पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतील एक तास रंगलेल्या सामन्यात बिन सीडेड संदिप देवरुखकरने (ओ.एन.जी.सी.) चौथ्या सीडेड जागतिक आणि विश्व विजेत्या प्रशांत मोरेचा (रिझर्व्ह बँक) २५-११, २५-० असा पराभव केला. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात संदिप देवरुखकरने बृहन्मुबई महानगरपालिकेच्या गिरीष तांबेला २५-७, २५-१५ असे पराभूत करत अंतिम फेरी गाठली होती. दुसर्‍या उपांत्य फेरीत प्रशांत मोरेने एअर इंडियाच्या झाहिर अहमदचा २५-१७, २५-१६ असा पराभव केला होता.

महिला एकेरी गटाच्या अंतिम फेरीत तीन तास रंगलेल्या सामन्यात माजी राज्य आणि राष्ट्रीय विजेती संगीता चांदोरकरने (रिझर्व्ह बँक) दुसर्‍या सीडेड प्रीति खेडेकरचा (सी. डी. ए. नेव्ही) २५-१९, ११-२५, २५-१६ असा पराभव केला आणि विजेतेपदाचा मान मिळविला.

First Published on: February 18, 2019 4:30 AM
Exit mobile version