मुंबई इंडियन्सच्या ‘या’ फलंदाजाचे सुनील गावस्करांनी केले कौतुक; म्हणाले, ‘भारतासाठी सर्व फॉर्मेटमध्ये…’

मुंबई इंडियन्सच्या ‘या’ फलंदाजाचे सुनील गावस्करांनी केले कौतुक; म्हणाले, ‘भारतासाठी सर्व फॉर्मेटमध्ये…’

दरवर्षी इंडियन प्रिमीयर लीगमध्ये (आयपीएल) अनेक युवा खेळाडू उत्तम कामगिरी करताना पाहायला मिळतात. खेळाडूंच्या यशस्वी खेळीनंतर त्यांना भारतीय संघात स्थान दिले जाते. त्यानुसार गेल्या अनेक आयपीएलमधून भारतीय संघाला असे बरेच खेळाडू मिळाले आहेत. यंदाही आयपीएलमधून काही खेळाडू भारतीय संघात पदार्पण करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबई इंडियन्स संघातून खेळणारा युवा फलंदाज तिलक वर्मा हा पदार्पण करू शकतो, असे भारताचे माजी क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांनी म्हटले आहे.

स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट लाईव्ह या शोमध्ये बोलताना सुनील गावस्कर यांनी तिलक वर्माचे कौतुक केले आहे. “तिलक वर्माने यंदाच्या हंगामात दिलासादायक कामगिरी केली आहे. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्धच्या सामन्यात संघ अडचणीत असताना त्याने केलेली यशस्वी खेळी संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. तिलक संपूर्ण मैदानात फटकेबाजी करु शकतो, स्ट्राईक रोटेट करण्याचं कसबही त्याच्यात आहे. त्यामुळे भविष्यात भारतासाठी सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये तो एक चांगला फलंदाज होऊ शकतो ”

तिलक वर्मा आयपीएल 2022 मध्ये मुंबई इंडियन्सचा युवा फलंदाज तिलक वर्मा यंदाच्या आयपीएलमध्ये चमकलेला एक युवा तारा आहे. तिलकने यंदाच्या पर्वातील 12 सामन्यात 40.89 च्या सरासरीने आणि 132.85 च्या स्ट्राइक रेटने 368 रन केले आहेत. तो ऑरेंज कॅपच्या शर्यतीतही 7 व्या स्थानावर आहे. तिलकने आयपीएल 2022 मध्ये दोन अर्धशतकं झळकावली असून 61 हा त्याचा सर्वोच्च स्कोर आहे.

तिलक वर्माने पाच वर्षापूर्वीचा ऋषभ पंतचा विक्रम मोडला आहे. 2017 मध्ये दिल्लीकडून खेळताना पंतने 14 सामन्यात 366 धावा केल्या होत्या. पृथ्वी शॉने 2019 साली 16 सामन्यांत 353 धावा चोपल्या होत्या. या दोन्ही खेळाडूंचा विक्रम तिलक वर्माने मोडला आहे.

मुंबईने तिलक वर्माला एक कोटी 70 लाख रुपयांत विकत घेतले होते. यंदाच्या हंगमात मुंबईकडून सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये तिलक वर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. तिलक वर्माने रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव आणि ईशान किशन यांनाही मागे टाकले आहे.


हेही वाचा – भारताच्या ‘या’ कुस्तीपटूने पराभवाच्या रागात पंचांना केली मारहाण

First Published on: May 17, 2022 11:18 PM
Exit mobile version