महात्मा गांधी, नवशक्तीची उपांत्य फेरीत धडक

महात्मा गांधी, नवशक्तीची उपांत्य फेरीत धडक

महात्मा गांधी, नवशक्ती, चेंबूर क्रीडा, संघर्ष या संघांनी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेतील ज्युनियर मुलींच्या गटाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. मुलांमध्ये श्री सिद्धी, जॉली, उत्कर्ष, सुरक्षा यांना उपांत्य फेरी गाठण्यात यश आले.

कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर सुरू असलेल्या या स्पर्धेतील मुलींच्या उपांत्यपूर्व सामन्यात महात्मा गांधी स्पोर्ट्सने स्वस्तिक क्रीडा मंडळाचा ३३-१५ असा पराभव केला. महात्मा गांधी स्पोर्ट्सने या सामन्याच्या सुरुवातीपासूनच दमदार खेळ करत मध्यंतराला १४-९ अशी आघाडी मिळवली. त्यांच्या विजयात सायली जाधव, सृष्टि चाळके या खेळाडू चमकल्या. दुसर्‍या सामन्यात नवशक्ती स्पोर्ट्स अकादमीने स्वराज्य स्पोर्ट्स क्लबला २९-१२ असे पराभूत करत उपांत्य फेरी गाठली. या सामन्याच्या मध्यंतराला नवशक्तीकडे १०-९ अशी केवळ एका गुणाची आघाडी होती. मात्र, उत्तरार्धात स्वराज्यचा खेळ खालावला आणि त्यांनी हा सामना गमावला. नवशक्तीकडून बेबी जाधव आणि रिबेका गवारे यांनी दमदार खेळ केला.

मुलांच्या गटातील पहिल्या उपांत्यपूर्व फेरीच्या सामन्यात श्री सिद्धी संघाने मुलुंड केंद्राला २९-२६ असे नमवले. दुसर्‍या सामन्यात जॉली स्पोर्ट्स क्लबने ओम सहकार मित्र मंडळाचे आव्हान ४२-३६ असे परतवून लावले. मध्यंतराला दोन्ही संघांत २२-२२ अशी बरोबरी होती. उत्तरार्धात जॉलीच्या दिनेश यादव, रजत राजकुमार यांनी उत्तम खेळ करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. स्वामी समर्थ स्पोर्ट्सने ५-५ चढायांच्या डावात उत्कर्ष मंडळावर २९-२३ (९-३) अशी मात केली.

या सामन्याच्या मध्यंतराला स्वामी समर्थकडे ९-६ अशी आघाडी होती. मात्र, पूर्ण डावात उत्कर्षला २०-२० अशी बरोबरी करण्यात यश आले. अखेर ५-५ चढायांच्या डावात स्वामी समर्थने ९-३ अशी बाजी मारत आगेकूच केली. स्वामी समर्थकडून मयूर जावळे, राजविलास जाधव उत्कृष्ट खेळले. अखेरच्या सामन्यात सुरक्षा क्रीडा मंडळाने चेंबूर क्रीडा केंद्राचा ३९-२५ असा पराभव केला.

आर्य इंटरप्रायझेसची आगेकूच

पुरुष व्यावसायिक गटाच्या उपांत्य फेरीतील सामन्यात बी.ए.आर.सी. संघाने विनय इलेक्ट्रिकवर २१-२० असा अवघ्या एका गुणाने विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. या सामन्याच्या विश्रांतीला विनय इलेक्ट्रिकने ७-६ अशी आघाडी घेतली होती. त्यांच्या या विजयात स्वप्नील घाग, नितीन पवार यांनी महत्त्वाचे योगदान दिले. उपांत्य फेरीच्या दुसर्‍या सामन्यात आर्य इंटरप्रायझेसने मायको फायनान्सला २१-२० असे पराभूत केले. आर्य इंटरप्रायझेसकडून शुभम शिंदे, अक्षय रोकडे उत्तम खेळले.

First Published on: November 26, 2019 5:13 AM
Exit mobile version