स्वस्तिक क्रीडा मंडळाला दुहेरी मुकुट!

स्वस्तिक क्रीडा मंडळाला दुहेरी मुकुट!

स्वस्तिक क्रीडा मंडळाने मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशन आयोजित जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या पुरुष आणि ज्युनियर मुले अशा दोन गटांचे जेतेपद पटकावले. सब-ज्युनियर गटात मुलांमध्ये सुरक्षा क्रीडा मंडळ, तर मुलींमध्ये स्वराज्य स्पोर्ट्स क्लब विजेते ठरले.

कुर्ला येथील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणावर झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात निलेश शिंदेच्या स्वस्तिक क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सला ३०-१२ असे सहज पराभूत केले. या सामन्याच्या मध्यंतराला त्यांनी १८-६ अशी भक्कम आघाडी घेतली होती. विश्रांतीनंतरही जॉलीच्या संघाला आपला खेळ उंचावता आला नाही. त्यामुळे स्वस्तिकने हा सामना ३०-१२ असा तब्बल १८ गुणांच्या फरकाने जिंकला. स्वस्तिकच्या विजयात सुयोग राजापकर आणि अभिषेक चव्हाण हे खेळाडू चमकले.

ज्युनियर मुलांच्या अंतिम सामन्यात स्वस्तिक क्रीडा मंडळाने अंबिका सेवा मंडळाचा ३४-१८ असा पराभव करत याही गटाचे जेतेपद पटकावले. स्वस्तिकने पूर्वार्धात उत्कृष्ट खेळ केल्याने अंबिकाला केवळ २ गुण मिळवता आले. त्यामुळे मध्यंतराला स्वस्तिककडे २०-२ अशी आघाडी होती. मध्यंतरानंतर अंबिकाने आपला खेळ सुधारला, पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. सिद्धेश पांचाळ आणि हृतिक कांबळे यांनी स्वस्तिक संघाकडून दमदार खेळ केला.

सब-ज्युनियर गटात मुलांमध्ये सुरक्षा क्रीडा मंडळाने जॉली स्पोर्ट्सवर ५१-३८ अशी मात केली. या सामन्याच्या मध्यंतराला सुरक्षा मंडळाकडे २२-१९ अशी अवघ्या तीन गुणांची आघाडी घेतली होती. मात्र, उत्तरार्धात त्यांनी अधिकच आक्रमक खेळ करत हा सामना सहजपणे जिंकला. त्यांच्याकडून आदित्य अंधेर, उदित यादव यांनी चांगला खेळ केला. सब-ज्युनियर मुलींमध्ये स्वराज्य स्पोर्ट्स क्लबने आकाश स्पोर्ट्स क्लबवर ४२-३४ अशी मात करत या गटाचे विजेतेपद मिळवले. याशिका पुजारी आणि आरती मुंगुटकर यांनी सुरुवातीपासून आक्रमक खेळ करत स्वराज्यच्या संघाला मध्यंतराला २८-१२ अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतरही त्यांनी चांगला खेळ सुरु ठेवत हा सामना जिंकला.

First Published on: November 28, 2019 5:30 AM
Exit mobile version