भारतासाठी खेळण्याबाबत विचार नाही – सर्फराज खान

भारतासाठी खेळण्याबाबत विचार नाही – सर्फराज खान

मुंबईचा युवा फलंदाज सर्फराज खानसाठी यंदाचा रणजी मोसम अविस्मरणीय ठरला. ४१ वेळच्या विजेत्या मुंबईला रणजी करंडकाची बाद फेरी गाठता आली नाही, पण सर्फराजने ६ सामन्यांत ९२८ धावा करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले. या स्पर्धेदरम्यान त्याने तीन डावांत एकदाही बाद न होता ६०५ धावा केल्या, ज्यात त्रिशतक आणि द्विशतकाचा समावेश होता. इतक्या दमदार कामगिरीनंतरही त्याला भारतासाठी खेळण्याबाबत विचार करायचा नाही.

आयपीएल असो की इतर एखादी स्पर्धा, मला संधी मिळाल्यावर मी चांगली कामगिरी केली आहे. मी भारतीय संघासाठी खेळण्याबाबत विचार करत नाही. मला वर्तमानात राहायचे आहे. प्रत्येक क्रिकेटचे भारतासाठी खेळण्याचे स्वप्न असते, पण त्यासाठी तुम्ही खूप मेहनत घेणे गरजेचे आहे, असे सर्फराजने सांगितले.

सर्फराजने वडिलांच्या सांगण्यावरून काही वर्षांपूर्वी मुंबई सोडून उत्तर प्रदेशला जाण्याचा निर्णय घेतला. परंतु, तिथे फारसे सामने खेळायला न मिळाल्याने त्याने पुन्हा मुंबई गाठली. याबाबत त्याने सांगितले, मुंबईमध्ये मला संधी मिळत नव्हती. मी खूप वाट पाहिली. मला वडिलांनी उत्तर प्रदेशला जाण्यास सांगितले आणि मी तसे केले. मात्र, तिथेही मला सामने खेळायला मिळाले नाहीत. त्यामुळे माझ्याकडे मुंबईत परतण्यावाचून पर्याय नव्हता. आता मला भूतकाळाचा विचार करायचा नाही. रणजी करंडकात मुंबईचे प्रतिनिधित्व करत असल्याचा मला अभिमान आहे.

First Published on: February 19, 2020 2:30 AM
Exit mobile version