२०२० वर्षात कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल १५ फलंदाजांत एकही भारतीय नाही

२०२० वर्षात कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या अव्वल १५ फलंदाजांत एकही भारतीय नाही

विराट कोहली

साल २०२० हे कोरोनाचे वर्ष म्हणून ओळखले जाईल. कोरोनामुळे खेळांचे वेळापत्रक विस्कटले. या महामारीचा क्रिकेटलाही फटका बसला. मार्चपासून काही काळ क्रिकेटचे सामने थांबले होते. मात्र, काही महिन्यांच्या कालावधीनंतर क्रिकेटला पुन्हा सुरुवात झाली. सर्वात पहिल्यांदा इंग्लंडने कोरोनाच्या विश्रांतीनंतर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. त्यामुळे यावर्षात सर्वाधिक कसोटी सामने हे इंग्लंडच्या खेळाडूंनीच खेळले. तसेच सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्येही इंग्लंडच्या खेळाडूंचा बोलबाला राहिला. २०२० वर्षात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांत भारताचा एकही फलंदाज अव्वल १५ मध्ये नव्हता.

भारताकडून यंदा अजिंक्य रहाणेने सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४ सामन्यांच्या ८ डावांत २७२ धावा केल्या. भारताचा कर्णधार विराट कोहलीला यावर्षी ३ कसोटीत केवळ ११६ धावा करता आल्या. २०२० वर्षात सर्वाधिक धावा करणारे पाच पैकी चार फलंदाज हे इंग्लंडचे आहेत. यावर्षी सर्वाधिक धावा केल्या त्या इंग्लंडच्या बेन स्टोक्सने. त्याने ७ कसोटी सामन्यांच्या १२ डावांत ६४१ धावा केल्या. यात २ शतके आणि २ अर्धशतकांचा समावेश होता. दुसऱ्या स्थानावर इंग्लंडचा डॉम सिबले (९ सामन्यांत ६१५ धावा) आणि तिसऱ्या स्थानावर झॅक क्रॉली (७ सामन्यांत ५८० धावा) होता.

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने उत्कृष्ट खेळ करत ४ सामन्यांतच ४९८ धावा चोपून काढल्या. यात एका द्विशतकाची समावेश होता. त्याने वेस्ट इंडिजविरुद्ध २५१ धावांची खेळी केली होती. भारताकडून यावर्षातील एकमेव कसोटी शतक हे रहाणेने केले. त्याच्या व्यतिरिक्त एकाही फलंदाजाला शतक करता आले नाही.

First Published on: December 31, 2020 9:24 PM
Exit mobile version