देशात क्रीडा संस्कृती रुजवण्याची हीच वेळ!

देशात क्रीडा संस्कृती रुजवण्याची हीच वेळ!

भारतासाठी 29 ऑगस्ट हा दिवस खूप खास आहे. याच दिवशी 1905 साली भारतीय हॉकीच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा जन्म झाला. मेजर ध्यानचंद असे नाव असलेल्या या हॉकीच्या जादुगाराने भारताला गौरव वाटावा अशी कामगिरी केली. ध्यानचंद संघात असताना भारतीय हॉकीने 1928, 1932 आणि 1936 अशा सलग तीन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदकाला गवसणी घातली. तसेच त्यांच्या आत्मचरित्रातील माहितीनुसार, त्यांनी कारकिर्दीत तब्बल 570 गोल केले. ध्यानचंद यांनी हॉकीला दिलेल्या या अभूतपूर्व योगदानाचा गौरव करण्यासाठी भारत सरकारने 2012 सालापासून त्यांचा जन्मदिवस (29 ऑगस्ट) राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली.

या दिवशी राष्ट्रपती भवनात विशेष सोहळ्याचे आयोजन केले जाते. या सोहळ्यात राष्ट्रपतींच्या हस्ते भारतीय खेळाडूंना खेलरत्न पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार, तर प्रशिक्षकांना द्रोणाचार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यामुळे भारतीय खेळाडूंसाठी या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. मागील वर्षी कोरोनामुळे हा सोहळा ऑनलाईन स्वरूपात पार पडला, तर यंदा पॅरालिम्पिक स्पर्धांत दमदार कामगिरी करणार्‍या खेळाडूंचाही सन्मान व्हावा यासाठी हा सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे.

यंदाचा राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळा अधिकच विशेष असणार आहे. याचे कारण म्हणजे, भारतीय खेळांसाठी मागील काही दिवस अविस्मरणीय आणि खूप यश देणारे ठरले आहेत. काही आठवड्यांपूर्वीच संपन्न झालेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये भारताने विक्रमी कामगिरी केली. भारताने टोकियोमध्ये सात पदके जिंकली, जी ऑलिम्पिक स्पर्धांच्या इतिहासातील भारताची सर्वोत्तम कामगिरी ठरली. भालाफेकपटू नीरज चोप्राने ऑलिम्पिकच्या अ‍ॅथलेटिक्स स्पर्धांत भारताला पहिलेवहिले सुवर्णपदक मिळवून दिले. त्यामुळे राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार सोहळ्यात त्याच्यासह ऑलिम्पिकमध्ये भारतीय तिरंग्याची शान वाढवणार्‍या खेळाडूंचा गौरव करण्यात येईल. या सोहळ्याकडे संपूर्ण भारताचे लक्ष असेल.

भारताला यंदा ऑलिम्पिकमध्ये पदकांच्या बाबतीत दुहेरी संख्या गाठता येईल असे म्हटले जात होते. तसे काही झाले नाही. मात्र, त्याच वेळी बरेच खेळाडू असेही होते, ज्यांनी पदके जिंकली नसली, तरी चाहत्यांची मने जिंकली. टोकियो ऑलिम्पिकमधील अनुभवी आणि नवख्या खेळाडूंनी केलेल्या चांगल्या कामगिरीमुळे आता क्रिकेटवेड्या भारतीयांचे इतर खेळांकडेही लक्ष वेधले गेले आहे. याचा फायदा घेत आता देशात क्रीडा संस्कृती रुजवण्याची हीच वेळ आहे.

क्रीडा संस्कृती रुजवायची म्हणजे नक्की काय करायचे? खरा भारत हा शहरांमध्ये नाही, तर गाव-पाड्यांमध्ये असल्याचे म्हटले जाते. त्यामुळे या गाव-पाड्यांमधील मुलांपर्यंत पोहचण्याचा, त्यांच्यापर्यंत खेळ नेण्याचा सर्वात आधी प्रयत्न झाला पाहिजे. तेथील अनेकांमध्ये चपळाई, काटकपणा आदी गुणधर्म निसर्गतःच असतात. तसेच त्यांची मेहनत घेण्याची तयारी असते. त्यांच्यात वेगळीच जिद्द असते. गुणवान खेळाडू घडण्यासाठी आणखी काय पाहिजे? परंतु, त्यांच्यातील खेळाडू शोधणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे, त्यांना योग्य सोयी-सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी शासन आणि क्रीडा प्राधिकरणाने योग्य ती व्यवस्था उभारली पाहिजे.

तसेच मुलांमध्ये लहानपणापासूनच खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी शालेय स्तरापासून प्रयत्न केले गेले पाहिजेत. तसे प्रयत्न आताही होत आहेत, पण त्यात अधिक गती, सुसूत्रता आली पाहिजे. आर्थिक स्थिती बेताची असणार्‍या, पण चांगले खेळाडू होण्याची क्षमता असलेल्या खेळाडूंना खेळांसाठी लागणारी साधने, लागणारा सकस आहार या गोष्टी उपलब्ध करून देण्यावरही भर देणेही खूप आवश्यक आहे. शालेय, जिल्हा, राज्य स्तरांवर अधिक आणि सातत्याने स्पर्धांचे आयोजन केल्यास प्रतिभावान खेळाडूंचा लवकर शोध घेतला जाऊ शकेल, जेणेकरून त्यांना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनात सराव करण्याची कमी वयातच संधी मिळू शकेल.

खेळाडूंची कामगिरी ही 90 टक्के त्यांच्या मानसिकतेवर आणि केवळ 10 टक्के त्यांच्या गुणवत्तेवर अवलंबून असते, असे म्हटले जाते. भारतीय खेळाडूंच्या गुणवत्तेत कमी नाही, पण त्यांच्या मानसिकतेत अधिक सुधारणा नक्कीच गरजेची आहे. ऑलिम्पिकसारख्या जागतिक स्पर्धांमध्ये सर्वोत्तम खेळाडूंविरुद्ध खेळताना भारताचे खेळाडू मानसिकदृष्ठ्या कमी पडतात, ते अधिक दडपण घेतात आणि त्यांचा खेळ खालावतो, अशी वारंवार टीका केली जाते. या गोष्टीचा नक्कीच विचार झाला पाहिजे. त्यांना सुरुवातीपासूनच अधिकाधिक स्पर्धांत खेळण्याची संधी मिळाल्यास दडपण कसे हाताळायचे, मोक्याच्या क्षणी सर्वोत्तम खेळ कसा करायचा, हे त्यांना कळू शकेल.

जागतिक स्पर्धांमध्ये यशस्वी ठरलेल्या नीरज चोप्रा, सिंधू, मेरी कोम, अभिनव बिंद्रा यांसारख्या खेळाडूंचे अनुभव युवा खेळाडूंपर्यंत पोहोचवले पाहिजेत. तसेच खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी चित्रपटही चांगले माध्यम ठरू शकेल. मेरी कोम आणि मिल्खा सिंग यांच्याप्रमाणेच भारताच्या अन्य प्रेरणादायी खेळाडूंची मेहनत, त्यांचे यश चित्रपटांच्या माध्यमातून युवकांपर्यंत पोहोचवता येऊ शकेल. या सर्व गोष्टी झाल्यास भारत क्रीडा क्षेत्रात नक्कीच गगनभरारी घेऊ शकेल.

खेळांमध्ये भारत आता योग्य मार्गावर असल्याचे टोकियो ऑलिम्पिकमधील निकालांवरून सिद्ध झाले. परंतु, ही केवळ सुरुवात असून दिल्ली अभी दूर है! राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्ताने भारताला आपल्या नव्या हिरोंचा सन्मान करण्याची संधी मिळेल. तसेच मेजर ध्यानचंद या महान हॉकीपटूच्या आठवणींना उजाळा मिळेल. परंतु, गौरवशाली भूतकाळाचा अभिमान बाळगतानाच सुवर्ण भविष्यासाठी योजना आखणे तितकेच गरजेचे आहे. भारताला हा समतोल राखण्यात यश आल्यास पुढील काही वर्षांत देशातील कानाकोपर्‍यातून अनेक गुणवान खेळाडू पुढे येत देशाला विविध स्पर्धांमध्ये अनेक पदके जिंकवून देण्याची कामगिरी करतील हे निश्चित!

First Published on: August 29, 2021 5:15 AM
Exit mobile version