बुमराहचा फार विचार करणे पडेल महागात!

बुमराहचा फार विचार करणे पडेल महागात!

  या दोन बलाढ्य संघांतील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेला १४ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. भारत सध्याच्या घडीला सर्वोत्तम एकदिवसीय संघांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तर मागील वर्षी डेविड वॉर्नर आणि स्टिव्ह स्मिथ यांचे संघात पुनरागमन झाल्यापासून ऑस्ट्रेलियाने सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. त्यामुळे या मालिकेची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहची इंग्लंडमध्ये झालेल्या विश्वचषकानंतर ही पहिलीच एकदिवसीय मालिका असणार आहे. त्यामुळे तो या मालिकेत दमदार कामगिरी करण्याचा प्रयत्न करेल. मात्र, त्याच्या गोलंदाजीचा फार विचार करणे आम्हाला महागात पडू शकते, असे मत ऑस्ट्रेलियाचा कर्णधार अ‍ॅरॉन फिंचने व्यक्त केले.

बुमराह फारच उत्कृष्ट गोलंदाज आहे. त्याच्याविरुद्ध पहिल्यांदा खेळणे आव्हानात्मक असते. मात्र, तुम्ही जसजसे सामने खेळता, तसतसे त्याची गोलंदाजी अधिक चांगल्या पद्धतीने कळू लागते. त्याच्या गोलंदाजीचा फार विचार करणे आम्हाला महागात पडू शकते. तुम्ही बुमराहविरुद्ध खेळत नसाल, तर त्याची गोलंदाजी पाहताना मजा येते. तो वेगाने आणि आक्रमक पद्धतीने गोलंदाजी करतो. तसे करताना तो अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतो, हे विशेष. आम्ही फलंदाज म्हणून केवळ आमच्या योजनांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे, असे फिंच म्हणाला.

फिरकीपटूंची भूमिका महत्त्वाची – कमिन्स

ऑस्ट्रेलियाने मागील भारत दौर्‍यातील एकदिवसीय मालिका ३-२ अशी जिंकली होती. आता काही दिवसांत सुरु होणार्‍या मालिकेत ऑस्ट्रेलियन संघ या कामगिरीची पुनरावृत्ती करु शकेल, असे ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सला वाटते. तसेच त्याने पुढे सांगितले, भारतातील सामन्यांत फिरकीपटू नेहमीच महत्त्वाची भूमिका बजावतात आणि यावेळी यात बदल होईल असे वाटत नाही. खासकरुन मधल्या षटकांत त्यांचे महत्त्व अधिकच वाढते. मागील मालिकेत आम्ही आणि भारताने दोन-दोन फिरकीपटू खेळवले होते.

First Published on: January 11, 2020 2:14 AM
Exit mobile version