भारताला फाईव्ह स्टार जेतेपद

भारताला फाईव्ह स्टार जेतेपद

भारतीय पुरुष हॉकी संघ

भारतीय पुरुष हॉकी संघाने न्यूझीलंडचा अंतिम सामन्यात ५-० असा पराभव करत ऑलिम्पिक चाचणी स्पर्धा जिंकली. याआधी या दोन संघांमध्ये झालेल्या साखळी सामन्यात न्यूझीलंडने २-१ अशी बाजी मारली होती. मात्र, बुधवारी भारतीय संघाने उत्कृष्ट खेळ करत न्यूझीलंडला जिंकण्याची संधीच दिली नाही. कर्णधार हरमनप्रीत सिंग (७ वे मिनिट), शमशेर सिंग (१८ वे मिनिट), नीलकांत शर्मा (२२ वे मिनिट), गुरसाहेबजीत सिंग (२६ वे मिनिट) आणि मनदीप सिंग (२७ वे मिनिट) यांनी गोल करत भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली.

अंतिम सामन्यात खेळत असल्याचा दबाव दोन्ही संघांवर सुरुवातीच्या क्षणात दिसला. मात्र, भारताने खेळ सुधारला. सामन्याच्या सातव्या मिनिटाला भारताला पेनल्टी कॉर्नर मिळाला, पण त्यांना या संधीचे गोलमध्ये रूपांतर करता आले नाही. भारताला पुन्हा पेनल्टी कॉर्नर मिळाला आणि यावेळी कर्णधार हरमनप्रीतने गोल करण्यात चूक केली नाही. भारताने न्यूझीलंडवर दबाव बनवून ठेवला. १८ व्या मिनिटाला पेनल्टी कॉर्नरवरून शमशेर सिंगने गोल करून भारताची आघाडी दुप्पट केली. चार मिनिटांनंतरच नीलकांत शर्माने गोल करत भारताला ३-० अशी आघाडी मिळवून दिली.

न्यूझीलंडने आक्रमण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, याचा फायदा भारतालाच झाला. न्यूझीलंडच्या खेळाडूकडून विवेक सागर प्रसादने चेंडू काढून घेतला. त्याच्या अप्रतिम पासवर गुरसाहेबजीतने गोल करून भारताला ४-० अशी आघाडी मिळवून दिली. मध्यंतरापूर्वी मनदीपने भारताचा पाचवा गोल केला. मध्यंतरानंतरही भारताने आपला दमदार खेळ सुरु ठेवला. मात्र, दोन्ही संघांना गोल करण्यात अपयश आल्याने भारताने हा सामना ५-० असा जिंकत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

महिला संघही विजयी

भारताच्या महिला संघानेही यजमान जपानवर मात करत ऑलिम्पिक चाचणी स्पर्धेचे जेतेपद मिळवले. जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असणार्‍या भारताने रंगतदार अंतिम सामन्यात जपानला २-१ असे पराभूत केले. ११ व्या मिनिटाला नवजोत कौरने गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. मात्र, पुढच्याच मिनिटाला जपानच्या मिनामी शिमीझूने गोल केल्याने सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली. मध्यंतरानंतर आक्रमक सुरुवात करणार्‍या भारताकडून लालरेम्सिआमीने ३३ व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे भारताने हा सामना २-१ असा जिंकला.

First Published on: August 22, 2019 5:00 AM
Exit mobile version