शिवा थापा, पूजा राणीची सुवर्ण कमाई

शिवा थापा, पूजा राणीची सुवर्ण कमाई

shiva-thapa

शिवा थापा (६३ किलो) आणि पूजा राणी (७५ किलो) या भारताच्या बॉक्सर्सना जपानमध्ये झालेल्या ऑलिम्पिक चाचणी बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सुवर्णपदक पटकावण्यात यश आले. पुरुषांच्या ६९ किलो वजनी गटात आशिषला मात्र रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. तसेच भारताच्या चार बॉक्सर्सनी या स्पर्धेत कांस्यपदके मिळवली.

चार वेळच्या आशियाई पदकविजेत्या शिवा थापाने ६३ किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत कझाकस्तानच्या राष्ट्रीय विजेत्या आणि आशियाई कांस्यपदक विजेत्या सनाताली टोलटायेव्हचा ५-० असा पराभव केला. थापाने मागील राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले होते. तसेच जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत त्याने कांस्यपदक पटकावले होते. आशिषला (६९ किलो) मात्र अंतिम फेरीत जपानच्या सेवोन ओकाझावाने पराभूत केले. त्यामुळे त्याला रौप्यपदक मिळाले.

एशियाड स्पर्धेमधील माजी कांस्यपदक विजेत्या पूजा राणीने महिलांच्या ७५ किलो वजनी गटाच्या अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करवर मात केली. त्यामुळे तिने सुवर्णपदकाची कमाई केली. राणीने यावर्षीच झालेल्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत रौप्यपदक पटकावले होते.

त्याआधी बुधवारी भारताच्या चार बॉक्सर्सना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले होते. महिलांमध्ये माजी ज्युनियर विश्व विजेत्या निखत झरीन (५१ किलो), सिमरनजीत कौर (६० किलो), तर पुरुषांमध्ये सुमित सांगवान (९१ किलो) आणि वाहलीमपुईआ (७५ किलो) यांचा पराभव झाल्याने त्यांना कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.

First Published on: November 1, 2019 4:17 AM
Exit mobile version