शरथ कमल अंतिम फेरीत

शरथ कमल अंतिम फेरीत

भारताचा आघाडीचा टेबल टेनिसपटू शरथ कमलने आयटीटीएफ चॅलेंजर प्लस ओमान ओपन स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. चौथ्या सीडेड शरथने तब्बल सात सेट चहलेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात रशियाच्या किरील स्काचकोव्हचा ११-१३, ११-१३, १३-११, ११-९, १३-११, ८-११, ११-७ असा पराभव केला. एक तास आठ मिनिटे चाललेल्या या सामन्याचे पहिले दोन सेट शरथने गमावले. मात्र, त्याने दमदार पुनरागमन करत पुढील तीन जिंकले. सहावा सेट स्काचकोव्हने जिंकत या सामन्यात ३-३ अशी बरोबरी केली. सातव्या आणि निर्णायक सेटमध्ये शरथने ११-७ अशी बाजी मारत स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला.

आशियाई ऑलिम्पिक पात्रतेला लक्षात घेऊन या स्पर्धेत खेळणे माझ्यासाठी फायदेशीर ठरेल. माझ्या क्रमवारीत आणि सीडींगमध्ये सुधारणा होईल. यंदा या स्पर्धेत भारताचे बरेच खेळाडू सहभागी झाले होते आणि प्रत्येकाचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळवण्याचे लक्ष्य होते. या स्पर्धेतील कामगिरीचा मला फायदा होईल, असे शरथ उपांत्य फेरीच्या सामन्यानंतर म्हणाला. शरथने २०१० नंतर प्रथमच आयटीटीएफ स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

हरमीत देसाई पराभूत
भारताच्या हरमीत देसाईला ओमान ओपन स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्याला अव्वल सीडेड पोर्तुगालच्या मार्कोस फ्रेइटसने पराभूत केले. फ्रेइटसने उपांत्य फेरीचा सामना ५-११, ११-९, ६-११, ६-११, ११-८, १३-११, ११-३ असा जिंकला. जागतिक क्रमवारीत ८७ व्या स्थानी असलेल्या हरमीतकडे चार सेटनंतर ३-१ अशी आघाडी होती. परंतु, यानंतर त्याचा खेळ खालावला आणि याचा फ्रेइटसने फायदा घेत सामना जिंकला. आता अंतिम फेरीत फ्रेइटससमोर शरथ कमलचे आव्हान असेल.

First Published on: March 16, 2020 2:06 AM
Exit mobile version