आमच्या संघाचे निर्णय चुकत आहेत!

आमच्या संघाचे निर्णय चुकत आहेत!

आंद्रे रसेलची टीका

कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलच्या यंदाच्या मोसमाची चांगली सुरुवात केली होती. त्यांना पहिल्या ५ पैकी ४ सामने जिंकण्यात यश आले होते. मात्र, त्यानंतरच्या ६ सामन्यांत त्यांना एकही विजय मिळवता आलेला नाही. त्यातच या ६ सामन्यांत कर्णधार दिनेश कार्तिक आणि संघ व्यवस्थापनाच्या काही निर्णयांवर बरेच प्रश्न उपस्थित केले जात आहेत. आता तर या संघाचा भाग असलेल्या आंद्रे रसेलनेच संघावर टीका केली आहे. आमच्या संघाचे निर्णय चुकत आहेत, असे त्याचे म्हणणे आहे.

आमचा संघ चांगला आहे, पण आम्ही चुकीचे निर्णय घेत आहोत. असे निर्णय घेत राहिलो तर आमचा पराभव होणारच आणि तेच आमच्यासोबत होत आहे. आम्ही अगदी सहजपणे सामने गमावत आहोत. मी काही सामनेही दाखवू शकतो ज्यात आम्ही चांगली गोलंदाजी केली असती किंवा योग्य गोलंदाजाला योग्यवेळी गोलंदाजी दिली असती, तर प्रतिस्पर्धी संघ अडचणीत आला असता आणि आम्ही सामना जिंकलो असतो, असे रसेल म्हणाला.

तसेच संघाच्या कामगिरीचा तुझ्यावर काय परिणाम होत आहे असे विचारले असताना रसेलने सांगितले, एक व्यावसायिक क्रिकेटपटू म्हणून ही चांगली परिस्थिती नाही. सलग सहा सामने गमावल्यानंतर रूममध्ये जाणेही अवघड होते. मी मागील दोन दिवस फक्त रूममध्ये बसून आहे.

First Published on: April 29, 2019 4:02 AM
Exit mobile version