मैदानाबाहेरही विराटच एक नंबर!

मैदानाबाहेरही विराटच एक नंबर!

विराट कोहलीचे उद्गार

क्रिकेटच्या मैदानावर नवनवे विक्रम रचणारा भारताचा कर्णधार विराट कोहली मैदानाबाहेरही विक्रम करण्यात पटाईत आहे. विराट हा सध्या जगातील सर्वोत्तम फलंदाज म्हणून ओळखला जातो. कसोटी असो, एकदिवसीय असो वा टी-२० क्रिकेट, विराट सर्वच प्रकारांमध्ये धावांचा डोंगर उभारत असतो. विराट क्रिकेट खेळून मालामाल होतोच, पण मैदानाबाहेरही तो कोटींची कमाई करतो. विराट फक्त जाहिरातींच्या माध्यमातून वर्षाला तब्बल १४६ कोटी कमावतो.

बीसीसीआयच्या वार्षिक कराराच्या ‘अ+’ या सर्वोच्च श्रेणीमध्ये विराटचा समावेश आहे. त्यामुळे तो वर्षाला ७ कोटींची कमाई करतो, तर जाहिरातींमधून कोहली वर्षाला १४६ कोटी कमावतो. विराट प्यूमा, ऑडी, टीसॉट, एमआरएफ टायर यांसारख्या मोठ्या आणि प्रचलित कंपन्यांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे. तो भारतीय खेळांमधील सर्वात लोकप्रिय चेहरा आहे. युवकांमध्ये त्याचा नेहमीच बोलबाला असतो. त्यामुळेच सर्व प्रचलित कंपन्या त्याला आपला ब्रँड अ‍ॅम्बेसेडर बनवण्यास उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आलेल्या फोर्ब्सच्या सर्वाधिक कमाई करणार्‍या जगातील अव्वल १०० खेळाडूंमध्ये विराट हा एकमेव क्रिकेटपटू होता.

जाहिरातींमधून सर्वाधिक कमाई करणार्‍या क्रिकेटपटूंमध्ये विराटनंतर भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा दुसरा क्रमांक लागतो. स्पार्टन, पेप्सी यासारख्या कंपन्यांचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर असणारा धोनी सध्या जाहिरातींमधून तब्बल १२० कोटी रुपये कमावतो. या यादीत तिसर्‍या स्थानावर हार्दिक पांड्या (१४ कोटी), चौथ्या स्थानावर रोहित शर्मा (७.२ कोटी) आणि पाचव्या स्थानावर शिखर धवन (५.२ कोटी) आहे.

First Published on: August 6, 2019 4:23 AM
Exit mobile version