पाकिस्तानी चाहत्यांना इम्रान खान सरकारच्या अजब निर्णयाचा फटका; इंग्लंडविरुद्धची मालिका पाहता येणार नाही 

पाकिस्तानी चाहत्यांना इम्रान खान सरकारच्या अजब निर्णयाचा फटका; इंग्लंडविरुद्धची मालिका पाहता येणार नाही 

इंग्लंडविरुद्धची मालिका पाकिस्तानी चाहत्यांना पाहता येणार नाही 

पाकिस्तान क्रिकेट संघ पुढील महिन्यात इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. पाकिस्तान आणि यजमान इंग्लंडमध्ये तीन एकदिवसीय व तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. परंतु, पाकिस्तानी चाहत्यांना हे सामने टीव्हीवर पाहता येणार नाही. याचे कारण म्हणजे, दक्षिण आशियात इंग्लंडमधील सामने दाखवण्याचे हक्क हे भारतीय कंपनीकडे आहेत. या भारतीय कंपनीशी कोणत्याही प्रकारचा करार करण्याची आमची तयारी नसल्याचे पाकिस्तानचे केंद्रीय माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी सांगितले. भारत सरकारने ५ ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. हा निर्णय बदलत नाही, तोपर्यंत पाकिस्तान आणि भारत यांच्यात कोणत्याही करार होणार नसल्याचे चौधरी यांनी स्पष्ट केले.

आर्थिक नुकसान होणार

दक्षिण आशियात इंग्लंडमधील सामने दाखवण्याचे हक्क हे भारतीय कंपनीकडे आहेत आणि आम्ही कोणत्याही भारतीय कंपनीशी करार करणार नाही, असे चौधरी म्हणाले. पाकिस्तानमध्ये सामने दाखवले जाणार नसल्याचा चाहत्यांना फटका बसणार आहेच, पण त्याचसोबत पाकिस्तान क्रिकेट बोर्ड आणि पीटीव्ही या कंपनीचे मोठे आर्थिक नुकसान होणार असल्याचे चौधरी म्हणाले.

पाकिस्तानी चाहते नाराज

दक्षिण आशियात इंग्लंडमधील सामने दाखवण्याचे हक्क हे सोनी पिक्चर्स नेटवर्क इंडिया (एसपीएन) या कंपनीकडे आहेत. परंतु, या भारतीय कंपनीशी चर्चा करण्यास इम्रान खान सरकार फारसे उत्सुक नाही. ही गोष्ट पाकिस्तानी चाहत्यांना मात्र फारशी आवडलेली नाही. त्यांनी आपली नाराजी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

First Published on: June 9, 2021 3:22 PM
Exit mobile version