पालघर राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा

पालघर राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा

शरीफ शेखला जेतेपद

नालासोपार्‍याच्या शरीफ शेखने महेश रायकरचा पराभव करत पालघर राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेतील पुरुष एकेरी गटाचे जेतेपद पटकावले. प्रौढ गटात यंगस्टार्स ट्रस्टच्या अव्वल सीडेड नवीन पाटीलने विजेतेपद मिळवले. ही प्रतिष्ठित स्पर्धा कै. भाऊसाहेब वर्तक सांस्कृतिक भवन, विरार (प) येथे पार पडली.

पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात शरीफ शेखने यंगस्टार्स ट्रस्टच्या बिनसीडेड महेश रायकरला २५-७, १३-२५, २५-१३ असे पराभूत केले. या सामन्याची दमदार सुरुवात करत शरीफने पहिला गेम २५-७ असा मोठ्या फरकाने जिंकला. मात्र, दुसर्‍या गेममध्ये महेशने दमदार पुनरागमन करत हा गेम २५-१३ असा आपल्या खिशात घातला. त्यामुळे सामन्यात १-१ अशी बरोबरी झाली. तिसर्‍या आणि निर्णायक गेममध्ये शरीफने सुरुवातीपासूनच चांगला खेळ केला. त्यामुळे त्याने हा गेम २५-१३ असा जिंकत या स्पर्धेचे जेतेपद पटकावले.

पुरुष प्रौढ एकेरीच्या अंतिम सामन्यात यंगस्टार्स ट्रस्टच्या नवीन पाटीलने रोमहर्षक लढतीत वसई क्रीडा मंडळाच्या गणेश फडकेवर २५-६, १४-२५, २५-१३ अशी मात केली. ही स्पर्धा जिंकणार्‍या नवीनला रोख रुपये दोन हजार आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. चार दिवस चाललेल्या या स्पर्धेत आंतरराष्ट्रीय कॅरम पंच जनार्धन संगम यांनी प्रमुख पंचाची भूमिका बजावली.

First Published on: July 19, 2019 4:46 AM
Exit mobile version