पंत हा युवकांमधील सर्वोत्तम फिनिशर!

पंत हा युवकांमधील सर्वोत्तम फिनिशर!

पृथ्वी शॉची स्तुती

दिल्ली कॅपिटल्सने आयपीएल प्ले-ऑफमधील बाद फेरीच्या सामन्यात सनरायजर्स हैद्राबादचा पराभव केला. आयपीएलच्या इतिहासात दिल्लीची बाद फेरीचा सामना जिंकण्याची ही पहिलीच वेळ होती. या सामन्यात हैद्राबादने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना १४ व्या षटकात दिल्लीची ५ बाद १११ अशी अवस्था होती आणि त्यांना जिंकण्यासाठी अजून ५२ धावांची गरज होती. मात्र, युवा रिषभ पंतने २१ चेंडूत २ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ४९ धावा करत दिल्लीचा विजय दृष्टिपथात आणला. दिल्लीला ५ धावांची गरज असताना तो बाद झाला, पण किमो पॉलने २ चेंडूत १ धावेची गरज असताना चौकार लगावत दिल्लीला विजय मिळवून दिला. त्यामुळे सामन्यानंतर पृथ्वी शॉने आपला सहकारी पंतची स्तुती केली. पंत हा युवकांमधील सर्वोत्तम फिनिशर आहे, असे तो म्हणाला.

टी-२० सामन्यात खूप दबाव असतो. आम्ही जिंकावे यासाठी मी प्रार्थना करत होतो. पंतने अप्रतिम खेळी केली. मी याआधीही म्हणालो आहे की पंत हा युवकांमधील सर्वोत्तम फिनिशर आहे. तो मैदानात असेपर्यंत आम्हाला जिंकण्याची संधी असतेच. तो सध्या खूप चांगली कामगिरी करत आहे. दुर्दैवाने त्याला हा सामना संपवता आला नाही, पण शेवटी किमो पॉलने चांगला खेळ केला, असे पृथ्वी म्हणाला.

आता दिल्लीचा ‘पात्रता फेरी-२’मध्ये चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध सामना होणार आहे. हा सामना जो जिंकेल तो संघ अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या सामन्यात योग्य त्या योजना आखून उतरू, असे हैद्राबादविरुद्धच्या सामन्यात ५६ धावांची खेळी करणार्‍या पृथ्वीने सांगितले. आमचा संघ चेन्नईला पोहोचताच योजना आखेल. हरभजन (सिंग), जाडेजा आणि इम्रान ताहिर यांच्याविरोधात कशी फलंदाजी करायची यासाठी आम्ही योजना आखू. मात्र, मला जर खराब चेंडू मिळाला, मग तो हरभजन किंवा ताहिर यांचाही असो, मी त्यावर मोठा फटका मारणारच, असे पृथ्वीने सांगितले.

पंत विश्वचषकाच्या संघात कसा नाही? – मायकल वॉन

रिषभ पंतला ३० मेपासून सुरू होणार्‍या विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान न मिळाल्याने अनेक क्रिकेट समीक्षकांना आणि चाहत्यांना आश्चर्य वाटले होते. आता इंग्लंडचा कर्णधार मायकल वॉननेही पंत विश्वचषकाच्या संघात कसा नाही, असा सवाल उपस्थित केला आहे. ‘पंत विश्वचषकाच्या संघात कसा नाही? भारताला अजूनही त्यांचा निर्णय बदलण्याची संधी आहे’, असे त्याने ट्विटमध्ये लिहिले होते.

First Published on: May 10, 2019 4:27 AM
Exit mobile version