पंतला आणखी वेळ दिला पाहिजे!

पंतला आणखी वेळ दिला पाहिजे!

भारतीय संघाने युवा यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंतला स्वतःला सिद्ध करण्यासाठी आणखी वेळ दिला पाहिजे, असे भारताचा माजी वेगवान गोलंदाज आशिष नेहराला वाटsते. भारतीय संघ व्यवस्थापन आणि निवड समितीने भविष्याचा विचार करत मागील वर्षीच्या विश्वचषकानंतर ३८ वर्षीय महेंद्रसिंग धोनीच्या जागी डावखुर्‍या पंतला संधी दिली. मात्र, त्याला धावांसाठी झुंजावे लागले, तर त्याने यष्टींमागेही काही चुका केल्या. त्यामुळे मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये त्याच्या जागी लोकेश राहुलने यष्टिरक्षणाची धुरा सांभाळली आहे. मात्र, ही बाब नेहराला फारशी आवडलेली नाही.

भारताकडे बरेच प्रतिभावान खेळाडू आहेत, पण त्यांना आणखी वेळ दिला पाहिजे. आपल्याला एकदिवसीय संघात पाचव्या आणि सहाव्या क्रमांकावर कोणता फलंदाज खेळणार हे माहित नाही. आता राहुल पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करत आहे आणि पंत, जो तुम्हाला वाटत होते की धोनीची जागा घेईल, तो सामना खेळणार्‍या खेळाडूंना पाणी द्यायचे काम करत आहे. पंतला संधी मिळाली आणि त्याला याचा फायदा घेता आला नाही हे खरे आहे. मात्र, त्यानंतरही तुम्ही त्याला संघासोबत ठेवले, कारण २२-२३ व्या वर्षीच त्याच्यात किती प्रतिभा आहे, हे तुम्हाला माहीत आहे. त्याला तुम्ही आणखी थोडा वेळ दिला पाहिजे, असे नेहरा म्हणाला.

कर्णधार म्हणून कोहली परिपक्व नाही!
विराट कोहली हा फारच उत्कृष्ट फलंदाज आहे, पण कर्णधार म्हणून त्याच्यात सुधारणा गरजेची आहे, असे नेहराला वाटते. कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाने खूप यश मिळवले आहे. मात्र, तरीही कर्णधार म्हणून त्याच्यात अजून सुधारणा गरजेची आहे. तो परिपक्व कर्णधार नाही. तो निर्णय घेण्यासाठी बर्‍याचदा घाई करतो, असे नेहराने नमूद केले.

First Published on: May 7, 2020 5:51 AM
Exit mobile version