पॅरालिम्पियन दीपा मालिका निवृत्त  

पॅरालिम्पियन दीपा मालिका निवृत्त  
  भारताच्या महिला पॅरा-खेळाडू दीपा मालिका यांनी सोमवारी खेळांमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. त्यांची भारतीय पॅरालिम्पिक समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. मात्र, राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार दीपा यांना हे पद स्वीकारण्यासाठी खेळांमधून निवृत्त होणे गरजेचे होते. त्यामुळे त्यांनी सोमवारी ट्विटरद्वारे निवृत्ती जाहीर केली.
निवडणुकीसाठी मी यापूर्वीच भारतीय पॅरालिम्पिक समितीला पत्र लिहिले होते. हायकोर्टने नव्या समितीला मान्यता देण्याची प्रतीक्षा करत होते. आता क्रीडा आणि युवक कल्याण मंत्रालयाशी जोडले जाण्यासाठी मी खेळांमधून निवृत्ती जाहीर करत आहे. पॅरा-खेळांसाठी काही तरी करण्याची आणि इतरांना यशस्वी होण्यासाठी मदत करण्याची आता वेळ आहे, असे दीपा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले.
राष्ट्रीय क्रीडा संहितेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सध्या खेळत असलेल्या खेळाडूंना कोणत्याही फेडरेशनमध्ये कोणतेही पद भूषवता येत नाही. त्यामुळे नियमांचे पालन करुन मला इतरांसमोर आदर्श ठेवायचा होता, असेही दीपा सोमवारीच निवृत्तीची घोषणा करण्याआधी म्हणाल्या होत्या. भारतात जे नियम आहेत, त्यानुसारच मला वागावे लागेल. मला जर पुन्हा खेळण्यासाठी विचारणा झाली, तर २०२२ एशियाडच्या वेळी मी पुनरागमनाचा विचार करीन. माझ्यातील खेळाडू कधीही दूर जाणार नाही. मात्र, मला आता निवृत्ती स्वीकारावी लागणार आहे, असे दीपा यांनी सांगितले होते.
खेलरत्न पुरस्कार मिळालेल्या पहिल्या महिला पॅरा-खेळाडू!  

दीपा मलिक या भारताच्या सर्वोत्तम पॅरा-खेळाडूंपैकी एक आहेत. त्यांना मागील वर्षीच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. खेलरत्न पुरस्कार मिळणाऱ्या त्या सर्वात वयस्कर आणि पहिल्या महिला पॅरा-खेळाडू होत्या. २०१६ साली झालेल्या रिओ पॅरालिम्पिक स्पर्धेत दीपा मलिक यांनी गोळाफेकमध्ये रौप्यपदक पटकावले होते. पॅरालिम्पिक स्पर्धेत पदक मिळवणाऱ्या त्या पहिल्या भारतीय महिला खेळाडू आहेत. त्यांच्या नावे ५८ राष्ट्रीय आणि २३ आंतरराष्ट्रीय पदके आहेत.

First Published on: May 12, 2020 4:50 AM
Exit mobile version