माझे यश कळायला आईवडिलांना वेळ लागला – हिमा दास

माझे यश  कळायला आईवडिलांना वेळ लागला – हिमा दास

फोटो - संदिप टक्के

 भारताची धावपटू हिमा दास हिने मागील काही काळात दमदार प्रदर्शन केले आहे. तिने जुलैमध्ये २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिली भारतीय महिला धावपटू होती. पण हिमाने इतका मोठा पराक्रम केला असला तरी तिच्या आईवडिलांना त्याचे महत्व कळायला काही वेळ लागला.

प्रसारमाध्यमांमुळे माझा पराक्रम आईवडिलांना कळला 

एका कार्यक्रमात याविषयी हिमा म्हणाली, “मी २० वर्षांखालील जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले. जागतिक स्पर्धेसाठी फिनलंडला जात आहे हे मी आईवडिलांना सांगितले नव्हते. त्यांना मी एका शिबिरासाठी जात आहे असे सांगून निघाले. मग त्यांनी मला टी.व्ही.वरच ही स्पर्धा जिंकताना पाहिले. सुरूवातीला त्यांना या विजयाचे महत्व कळले नाही. त्यांना मी जेव्हा फोन करून माझ्या जिंकण्याबद्दल प्रतिक्रिया विचारली तेव्हा ते मला म्हणाले आता खूप रात्र झाली असल्याने आम्हाला झोपायचे आहे. मी म्हटले मी वर्ल्ड चॅम्पियन झाले आहे आणि तुम्ही झोपताय. तर वडील म्हणाले की आता जे काय ते सकाळी उठल्यावर बघू. दुसऱ्या दिवशी प्रसारमाध्यमांनी माझ्या घरी यायला सुरूवात केली. तेव्हा कुठे त्यांना मी केलेल्या पराक्रमाचे महत्व कळले.”

चानूने आईच्या सांगण्यावरून खेळ खेळण्यास सुरूवात केली

एडलवाईज या वित्तीय सेवा पुरवणाऱ्या समूहाने हिमा दास हिची ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. याची एका कार्यक्रमात घोषणा करण्यात आली. या कार्यक्रमाला नुकतेच खेलरत्न पुरस्कार मिळालेली वेटलिफ्टर मीराबाई चानू, अर्जुन पुरस्कार विजेती हॉकीपटू राणी रामपाल आणि नेमबाज हीना सिधू यांनीही हजेरी लावली होती. विश्वविजेती वेटलिफ्टर  मीराबाई चानूने आईच्या सांगण्यावरून खेळ खेळण्यास सुरूवात केली होती, “माझे आईवडील आणि दोन भाऊ हे फुटबॉल खेळतात. पण सुरुवातीला मला खेळात फारसा रस नव्हता. माझ्या आईने मला खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. मात्र कोणता खेळ खेळायचा हा प्रश्न होताच. मणिपूरमध्ये जेवण बनवण्यासाठी लाकडे लागतात. जड लाकडे उचलण्याची मला आधीपासून सवय होतीच, त्यामुळे मी वेटलिफ्टिंगकडे आकर्षित झाले. सुरुवातीला आईला मी वेटलिफ्टिंग करण्याबाबत प्रश्न होते. पण नंतर तिने होकार दिला. त्यामुळे माझा वेटलिफ्टिंगचा प्रवास सुरू झाला.”

घर बनवायचे हे एकच ध्येय ठेऊन खेळायला सुरूवात

भारतीय महिला हॉकी संघाची कर्णधार रानी रामपाल हिने आपल्या कुटुंबासाठी घर बनवायचे हे एकच ध्येय ठेऊन खेळण्याचा प्रवास सुरू केला, “माझ्या घरची परिस्थिती फारशी चांगली नव्हती. माझे वडील बैलगाडी चालवायचे. माझे आईवडील खूप मेहनती होते. पावसाळ्यात आमच्या घरात पाणी यायचे. त्यामुळे कुटुंबासाठी घर बनवायचे हे एकच ध्येय ठेऊन मी खेळायला सुरूवात केली होती.”
First Published on: September 29, 2018 2:00 AM
Exit mobile version