‘या’ संघाचे तब्बल दहा खेळाडू अडकले लिफ्टमध्ये!

‘या’ संघाचे तब्बल दहा खेळाडू अडकले लिफ्टमध्ये!

पॅरिस सेंट जर्मान संघ  

युएफा चॅम्पियन्स लीग ही युरोपातील सर्वोत्तम व्यावसायिक फुटबॉल स्पर्धा म्हणून ओळखली जाते. मागील वर्षी जर्मनीतील बायर्न म्युनिक संघाने या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्यांनी अंतिम सामन्यात फ्रेंच संघ पॅरिस सेंट जर्मानचा पराभव केला होता. आता चॅम्पियन्स लीगच्या नव्या मोसमाला सुरुवात झाली असून पॅरिसचा संघ पुन्हा एकदा दमदार कामगिरी करेल अशी अपेक्षा आहे. नुकताच पॅरिसच्या संघाचा चॅम्पियन्स लीगमध्ये जर्मन संघ आरबी लॅपझिगशी सामना झाला. हा सामना पॅरिसने २-१ असा गमावला. मात्र, सामन्याच्या आधीच्या दिवशी पॅरिस संघाचे खेळाडू एका विचित्र अडचणीत सापडले होते.

लॅपझिगविरुद्धचा सामना होणार, त्याच्या आदल्या दिवशी पॅरिसचे तब्बल दहा खेळाडू हॉटेलच्या लिफ्टमध्ये साधारण ५० मिनिटे अडकले होते. या दहा खेळाडूंमध्ये अँजेल डी मरिया, मार्क्विनियोस, प्रेसनेल किंपेंबे या प्रमुख खेळाडूंचाही समावेश होता. अखेर अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी पॅरिसच्या सर्व खेळाडूंना लिफ्टमधून बाहेर काढले. पॅरिसचा खेळाडू लेविन कुरझावाने याचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर पोस्ट केला होता. मात्र, पॅरिस संघाच्या अधिकाऱ्यांनी त्याला ही पोस्ट डिलीट करण्यास सांगितली. त्यानंतरच्या दिवशी लॅपझिगविरुद्ध झालेला सामना पॅरिसने २-१ असा गमावला.

First Published on: November 13, 2020 5:24 PM
Exit mobile version