IPL 2020 : कमिन्सने कोलकाताला सावरले; मुंबईला १४९ धावांचे आव्हान

IPL 2020 : कमिन्सने कोलकाताला सावरले; मुंबईला १४९ धावांचे आव्हान

पॅट कमिन्स 

पॅट कमिन्सने केलेल्या नाबाद अर्धशतकामुळे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या आयपीएल सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स संघाने प्रथम फलंदाजी करताना ५ बाद १४८ अशी धावसंख्या उभारली. कोलकाताच्या डावाची निराशाजनक सुरुवात झाली होती. त्यांची ५ बाद ६१ अशी अवस्था होती. यानंतर मात्र पॅट कमिन्सने ३६ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ५३ धावांची खेळी केली. हे त्याचे टी-२० क्रिकेटमधील पहिलेच अर्धशतक ठरले. त्याच्या या खेळीने कोलकाताला सावरले आणि या संघाने मुंबईविरुद्ध सन्मानजनक धावसंख्या उभारली.

अबू धाबी येथे होत असलेल्या या सामन्यात कोलकाताचा नवा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. कोलकाताच्या डावाची खराब सुरुवात झाली. राहुल त्रिपाठी (७) आणि नितीश राणा (५) हे झटपट बाद झाले. युवा सलामीवीर शुभमन गिलने काही काळ चांगली फलंदाजी करत २३ चेंडूत दोन चौकारांच्या मदतीने २१ धावांची खेळी केली. मात्र, त्याला लेगस्पिनर राहुल चहरने बाद केले. चहरने पुढच्याच चेंडूवर दिनेश कार्तिकचा (४) त्रिफळा उडवत कोलकाताला चौथा झटका दिली.

विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखल्या जाणाऱ्या आंद्रे रसेललाही चांगला खेळ करता आला नाही. १२ धावांवर त्याला जसप्रीत बुमराहने अप्रतिम बाऊंसर टाकत बाद केले. त्यामुळे कोलकाताची ५ बाद ६१ अशी अवस्था झाली होती. यानंतर मात्र कमिन्स आणि मॉर्गन यांनी ८७ धावांची अभेद्य भागीदारी रचत कोलकाताचा डाव सावरला. मॉर्गनने २९ चेंडूत नाबाद ३९, तर कमिन्सने ३६ चेंडूत नाबाद ५३ धावांची खेळी केली. त्यामुळे कोलकाताने २० षटकांत ५ बाद १४८ अशी धावसंख्या उभारली.

First Published on: October 16, 2020 9:48 PM
Exit mobile version