‘त्याला’ नक्कीच आनंद झाला असेल, अर्जेंटिनाच्या विजयानंतर पेलेंचा रुग्णालयातून भावनिक संदेश

‘त्याला’ नक्कीच आनंद झाला असेल, अर्जेंटिनाच्या विजयानंतर पेलेंचा रुग्णालयातून भावनिक संदेश

अर्जेंटिनाच्या विजयानंतर लिओनेल मेस्सीला ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांनी वर्ल्डकप विजयाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्यांनी फ्रान्सच्या एम्बापेचंही कौतुक केलं आहे. तीन वेळा विश्वचषक जिंकणारे पेले सध्या श्वसनाच्या समस्येवर उपचारासाठी रुग्णालयात दाखल आहेत. जगातील महान फुटबॉलपटूंपैकी एक असलेले पेले यांनी फिफा विश्वचषक २०२२चे विजेतेपद जिंकल्याबद्दल अर्जेंटिनाचे अभिनंदन केले आहे.

फुटबॉलने आज पुन्हा एकदा रंजक पद्धतीने आपली कहाणी सादर केली. मेस्सीने पहिला विश्वचषक जिंकला, ज्यावर त्याचा नक्कीच अधिकार होता. माझा प्रिय मित्र एम्बापेनं अंतिम फेरीत चार गोल (पेनल्टी शूटआउटसह) केले. खेळाच्या भवितव्यासाठी ही शानदार कामगिरी पाहणे एखाद्या भेटवस्तूपेक्षा कमी नव्हते, असं पेले यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे.

या सामन्यात मेस्सीने दोन गोल केले, तर एम्बापेनं फ्रान्ससाठी तीनही गोल केले. पेले यांनी उपांत्य फेरीत स्थान मिळविणारे पहिले आफ्रिकन राष्ट्र असलेल्या मोरोक्कोचेही अभिनंदन केले आणि अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू डिएगो मॅराडोना यांचेही स्मरण करून आपला संदेश पूर्ण केला. अर्जेंटिनाचे अभिनंदन. डिएगो मॅराडोना आता नक्कीच हसत असेल. तो जिथे कुठे असेल तिथे त्याला नक्कीच आनंद झाला असेल, असा भावनिक संदेश पेलेंनी पोस्ट केला आहे.

कतारमधील लुसेल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यात अर्जेंटिनाने फ्रान्सवर ४-२ असा पेनल्टी शूटआऊटवर विजय मिळवल्यानंतर पेलेंनी इन्स्टाग्रामवर आपली भावनिक पोस्ट शेअर केली. सामन्याबद्दल बोलायचे झाले तर, अर्जेंटिना आणि फ्रान्स यांच्यातील हा सामना आतापर्यंतचा सर्वात रोमांचक सामना ठरल्याचं म्हटलं जात आहे.


हेही वाचा : फ्रान्स-अर्जेंटिना सामन्यावरून केरळमध्ये हिंसाचार; तीन जणांवर चाकू हल्ला


 

First Published on: December 19, 2022 5:51 PM
Exit mobile version