महाराष्ट्राच्या मुलींना बास्केटबॉलमध्ये रौप्य

महाराष्ट्राच्या मुलींना बास्केटबॉलमध्ये रौप्य

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या बास्केटबॉलमध्ये प्रथमच अंतिम फेरी गाठणार्‍या महाराष्ट्राच्या मुलींना २१ वर्षांखालील गटात रौप्यपदक मिळाले. या गटाच्या अंतिम सामन्यात केरळने महाराष्ट्राला ८८-६३ असे पराभूत केले. तसेच १७ वर्षांखालील मुलांच्या फुटबॉलमध्ये महाराष्ट्राला अंतिम फेरी गाठण्यात अपयश आले. उपांत्य फेरीच्या लढतीत घरच्या मैदानावर खेळणार्‍या आसामच्या संघाने महाराष्ट्रावर ३-० अशी मात केली.

२१ वर्षांखालील मुलींच्या बास्केटबॉलमधील महाराष्ट्र आणि केरळ यांच्यातील अंतिम सामना पूर्वार्धात चुरशीचा झाला. महाराष्ट्राच्या मुलींनी केरळला चांगली झुंज दिली. त्यामुळे मध्यंतराला केरळकडे ४३-३८ अशी अवघ्या ५ गुणांची आघाडी होती.

मात्र, मध्यंतरानंतर केरळच्या संघाने आपला खेळ उंचावत हा सामना ८८-६३ असा जिंकला आणि सुवर्णपदक पटकावले. केरळच्या विजयात श्रीकला राणी (३० गुण) आणि जोमा जिगो (२० गुण) यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सुझानी पिंटो (१९ गुण) आणि श्रेया दांडेकर (१६ गुण) यांनी महाराष्ट्राकडून चांगला खेळ केला, पण या दोघींना इतरांची फारशी साथ लाभली नाही.

First Published on: January 22, 2020 5:48 AM
Exit mobile version