घरच्या मैदानावर खेळणे इंग्लंडसाठी फायदेशीर!

घरच्या मैदानावर खेळणे इंग्लंडसाठी फायदेशीर!

Virat Kohli

इंग्लंडमध्ये ३० मेपासून सुरू होणारा क्रिकेट विश्वचषक जिंकण्यासाठी भारत आणि इंग्लंड या संघांना प्रमुख दावेदार मानले जात आहे. हे दोन्ही संघ सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या आणि दुसर्‍या स्थानी असून, त्यांनी मागील काही वर्षांत दमदार कामगिरी केली आहे. मात्र, या विश्वचषकात भारतापेक्षाही इंग्लंडचे पारडे जड आहे, कारण ते आपल्या घरच्या मैदानावर खेळणार आहेत, असे मत भारताचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले.

आमचा संघ जगात कोठेही खेळो, आम्हाला चाहत्यांचा पाठिंबा मिळतोच. मात्र, हा विश्वचषक जिंकण्यासाठी प्रमुख दावेदार कोण असे तुम्ही मला विचाराल तर मी सध्यातरी इंग्लंडचेच नाव घेईन. त्यांना घरच्या मैदानावर खेळण्याचा फायदा मिळेल. त्यांच्याच परिस्थितीत हा संघ खूप चांगला खेळतो. मात्र, इंग्लंडप्रमाणेच या स्पर्धेतील सर्व संघ संतुलित आहेत आणि या स्पर्धेत प्रत्येक संघ इतर सर्व संघांशी सामना खेळणार असल्याने हा विश्वचषक खूपच आव्हानात्मक होणार आहे. माझ्या मते हा विश्वचषक आतापर्यंतच्या सर्वोत्तम विश्वचषकांपैकी एक असणार आहे, असे विराट म्हणाला.

तसेच सध्याच्या भारतीय संघात विश्वचषकात खेळणार्‍या इतर ९ संघांमधील एखादा खेळाडू निवडायची मुभा दिल्यास तू कोणाला निवडशील, असे विचारले असता विराट म्हणाला, आमचा संघ खूपच मजबूत आहे. त्यामुळे इतर संघातील खेळाडू निवडणे अवघड आहे. मात्र, मला एक खेळाडू निवडायचाच असल्याने आणि आता एबी डिव्हिलियर्स निवृत्त झाल्याने मी फॅफ डू प्लेसिसची निवड करेन.

विराट माणूस नाही, मशीन – ब्रायन लारा

भारताचा कर्णधार विराट कोहलीला धावांची जी भूक आहे आणि जितक्या सातत्याने तो धावा करतो त्यामुळे तो माणूस नाही, मशीन आहे, असे विधान वेस्ट इंडिजचा महान फलंदाज ब्रायन लाराने केले. तो माणूस नाही, मशीन आहे. तो ८०, ९०च्या दशकातील खेळाडूंपेक्षा खूप वेगळा आहे. आम्ही खेळत होतो, तेव्हाही फिटनेस ही गोष्ट खूप महत्त्वाची होती. मात्र, आता जितके क्रिकेट खेळले जाते, ते पाहता फिटनेसचे महत्त्व अधिकच वाढले आहे. विराट आपल्या फिटनेसवर खूप मेहनत घेतो आणि त्यामुळेच तो इतका यशस्वी झाला आहे. तो जेव्हाही मैदानात उतरतो, तेव्हा धावा करतो. विराट हा खूपच खास खेळाडू आहे आणि युवा खेळाडूंनी त्याच्याकडून प्रेरणा घेतली पाहिजे, असे लारा म्हणाला.

First Published on: May 25, 2019 4:26 AM
Exit mobile version