हरभजन, ताहिर दिवसेंदिवस परिपक्व होत आहेत!

हरभजन, ताहिर दिवसेंदिवस परिपक्व होत आहेत!

Mahendra Singh Dhoni

चेन्नई सुपर किंग्स संघाने यंदाच्या आयपीएलमध्ये खूपच चांगली कामगिरी केली आहे. त्यांना आतापर्यंत ६ पैकी ५ सामने जिंकण्यात यश आले आहे. या त्यांच्या चांगल्या कामगिरीत अनुभवी फिरकी जोडगोळी हरभजन सिंग आणि इम्रान ताहिर यांचा मोलाचा वाटा आहे. ३८ वर्षीय हरभजनने ४ सामन्यांत ७ विकेट तर ४० वर्षीय ताहिरने ६ सामन्यांत ९ विकेट घेतल्या आहेत. त्यामुळे चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीने या दोघांची स्तुती केली आहे. हे दोघे दिवसेंदिवस परिपक्व होत आहेत, असे धोनी म्हणाला.

वय हे जणू त्यांच्या बाजूने आहे. ते जुन्या वाईनप्रमाणे आहेत आणि दिवसेंदिवस परिपक्व होत आहेत. हरभजनने आतापर्यंत जितके सामने खेळले आहेत, त्या सर्वच सामन्यांमध्ये चांगली कामगिरी केली आहे. तसेच जेव्हाही मला गरज भासली आहे तेव्हा मी ताहिरवर विश्वास ठेवला आणि त्याने अप्रतिम कामगिरी करत माझा विश्वास सार्थकी लावला आहे. त्याला मी जर सांगितले की एखाद्या खेळपट्टीवर एका विशिष्ट वेगाने गोलंदाजी कर, तर तो त्याच वेगाने गोलंदाजी करतो, असे या दोघांबद्दल धोनी म्हणाला.

अशाप्रकारची खेळपट्टी नको

चेन्नई सुपर किंग्सने यंदाच्या मोसमात आपल्या घरच्या मैदानावर ४ पैकी ४ सामने जिंकले आहेत. मात्र, असे असतानाही महेंद्रसिंग धोनीने चेपॉकच्या खेळपट्टीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. या खेळपट्टीवर आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासूनच टीका होत आहे. या खेळपट्टीबाबत धोनी म्हणाला, आम्हाला अशा खेळपट्ट्यांवर खेळायचे नाही. यावर खूपच कमी धावा होत आहेत. या खेळपट्टीवर आमच्या फलंदाजांनाही खेळायला अडचण येत आहे. आम्ही घरच्या मैदानावरील सर्व सामने जिंकलो असलो तरी आम्हाला यापेक्षा चांगल्या खेळपट्टीवर खेळायला आवडेल.

First Published on: April 11, 2019 4:17 AM
Exit mobile version