भारत-पाक सामन्यांत दोन्ही संघावर दबाव!

भारत-पाक सामन्यांत दोन्ही संघावर दबाव!

इमाम-उल-हकचे मत

क्रिकेट विश्वचषकातील न्यूझीलंडविरुद्धचा सामना रद्द झाल्यानंतर भारतीय चाहत्यांचे आता लक्ष लागले आहे, ते मँचेस्टरमध्ये रविवारी होणार्‍या भारत विरुद्ध पाकिस्तान या कट्टर प्रतिस्पर्धी संघांमधील सामन्याकडे. भारतीय संघाने या विश्वचषकाची दमदार सुरुवात केली आहे. मात्र, पाकिस्तानचे या स्पर्धेतील प्रदर्शन निराशाजनक आहे. त्यांना ४ पैकी केवळ १ सामना जिंकण्यात यश आले आहे, तर श्रीलंकेविरुद्धचा सामना पावसामुळे रद्द झाला. त्यामुळे १० संघांचा समावेश असलेल्या या विश्वचषकाच्या गुणतक्त्यात ३ गुणांसह ते आठव्या स्थानी आहेत.

मात्र, भारताविरुद्धच्या सामन्यात फॉर्मला फारसे महत्त्व नसेल. पाकिस्तान आणि भारत हे संघ आमनेसामने आले की दोन्ही संघांवर खूप दबाव असतो, त्यामुळे जो संघ चांगला खेळेल तो जिंकेल, असे मत पाकिस्तानचा सलामीवीर इमाम-उल-हकने व्यक्त केले.

आमचा (पाकिस्तनाचा) एक सामना पावसामुळे रद्द झाला. ही आमच्यासाठी चांगली गोष्ट नव्हती. तो सामना आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. त्यामुळे यापुढील सामन्यांचे महत्त्व आमच्यासाठी अधिक वाढले आहे. त्यामुळे भारताविरुद्धचा सामना जिंकणे अनिवार्य आहे, असे म्हणता येईल. या सामन्यामध्ये खेळण्यासाठी मी खूप उत्सुक आहे.

मँचेस्टरमध्ये खूप पाकिस्तानी चाहते राहतात ही आमच्यासाठी चांगली गोष्ट आहे. या सामन्यात दोन्ही संघांवर खूप दबाव असणार आहे. पाकिस्तान आणि भारत हे संघ आमनेसामने आले की बर्‍याच गोष्टी घडतात. या सामन्याला पार्श्वभूमी असते. मात्र, आम्हाला फक्त क्रिकेटवर लक्ष केंद्रित करायचे आहे, असे इमाम म्हणाला.

पाक संघ बाबर आणि माझ्यावर अवलंबून – इमाम

पाकिस्तानच्या आघाडीचे फलंदाज इमाम-उल-हक आणि बाबर आझम यांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध चांगली सुरुवात केली होती. मात्र, इमाम ५३ आणि बाबर ३० धावांवर बाद झाला. यानंतरच्या फलंदाजांनी झुंजार खेळी करत पाकिस्तानला सामना जिंकवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना सामना जिंकण्यात अपयश आले. या पराभवाबाबत इमाम म्हणाला, आमचा संघ बाबर आणि माझ्यावर अवलंबून आहे. जेव्हा बाबर बाद झाला, तेव्हा दुसर्‍या बाजूने चांगली फलंदाजी सुरू ठेवणे ही माझी जबाबदारी होती. मात्र, मी खराब चेंडूवर बाद झालो. विंडीजविरुद्धही मी हीच चूक केली होती.

First Published on: June 14, 2019 4:21 AM
Exit mobile version