Video: मैदानावर पृथ्वी शॉनं केलं असं काही, की चाहते भडकले!

Video: मैदानावर पृथ्वी शॉनं केलं असं काही, की चाहते भडकले!

अवघ्या २०व्या वर्षी आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये भारताकडून खेळायची संधी मिळालेला मुंबईचा धडाकेबाज क्रिकेटपटू आणि फलंदाज पृथ्वी शॉ आता भलताच चर्चेत आला आहे. पण तो त्याच्या कामगिरीमुळे किंवा कुठल्या संस्मरणीय खेळीमुळे नसून त्याच्या उद्धट वाटणाऱ्या हावभावांमुळे तो चर्चेत आला आहे. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमधून पृथ्वी शॉ ने ८ महिन्यांनंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन केलं. मात्र, या सामन्यामध्ये आसामविरुद्ध तडाखेबाज अर्धशतक झळकावल्यानंतर त्याने केलेले हावभाव नेटिझन्स आणि क्रिकेट चाहत्यांना अजिबात रुचलेले नाहीत. विराट कोहलीप्रमाणेच त्याने हावभाव करण्याचा प्रयत्न केला, पण त्यामुळे त्याचा उद्धटपणाच दिसून आल्याचं क्रिकेट चाहत्यांचं म्हणणं आहे.

नक्की झालं काय?

पृथ्वी शॉवर डोपिंग प्रकरणी ८ महिन्यांची बंदी बीसीसीआयने घातली होती. खोकल्याच्या औषधातून परवानगी नसलेलं द्रव्य त्याने सेवन केल्याचा त्याच्यावर आरोप होता. त्यामुळे ८ महिन्यांनंतर पहिल्यांदाच पृथ्वी शॉ कमबॅक करत होता. मुंबईकडून सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेच्या सामन्यात वानखेडेवर आसामविरूद्ध पृथ्वी शॉने अवघ्या ३९ चेंडूंमध्ये ६३ धावा तडकावल्या. मात्र, अर्धशतक झाल्यानंतर शॉने मैदानात बसलेल्या प्रेक्षकांकडे बघून बॅट दाखवली आणि हाताने इशारे केले. यातून तो दाखवत होता की ‘माझी बॅट सगळी उत्तरं देते’.

विराट कोहलीने देखील ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या एका मॅचमध्ये शतक झळकावल्यानंतर अशा प्रकारे सेलिब्रेट केलं होतं. तसंच काहीसं पृथ्वी शॉ देखील करायला गेला. पण तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. त्यामुळेच नेटिझन्स आणि क्रिकेट चाहत्यांनी पृथ्वी शॉच्या या वागण्यावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. काहींनी तर पृथ्वी शॉ अशा अॅटिट्यूडमुळे दुसरा विनोद कांबळी होऊ शकतो, अशी देखील टीका केली आहे.

काय केलं होतं विराट कोहलीने?

दरम्यान, ज्या विराट कोहलीसारखे हावभाव पृथ्वीने केले, ती परिस्थिती वेगळी होती. २०१८मध्ये विराट कोहलीने पर्थवर झालेल्या कसोटी सामन्यामध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध शतक झळकावलं होतं. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघाविरुद्ध त्यांच्याच भूमीवर शतक झळकावून कमबॅक करणाऱ्या विराट कोहलीने शतक झळकावून आपल्या टीकाकारांना गप्प केलं होतं. त्यानंतर विराट कोहलीने अशा प्रकारे शतक सेलिब्रेट केलं होतं. मात्र, आसामसारख्या कमजोर संघाविरुद्ध अर्धशतक झळकावल्यानंतर पृथ्वी शॉ ने अशा प्रकारे अॅटिट्यूड दाखवणं चुकीचं होतं, अशी प्रतिक्रिया नेटिझन्सकडून दिली जात आहे.

First Published on: November 19, 2019 12:08 PM
Exit mobile version