IND vs AUS : पृथ्वी शॉला ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या मार्गदर्शनाची गरज – पनेसार

IND vs AUS : पृथ्वी शॉला ‘या’ माजी क्रिकेटपटूच्या मार्गदर्शनाची गरज – पनेसार

पृथ्वी शॉ

भारताचा युवा सलामीवीर पृथ्वी शॉला ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत चांगला खेळ करता आला नाही. या कसोटीच्या पहिल्या डावात शॉ खातेही न उघडता बाद झाला, तर दुसऱ्या डावात तो केवळ चार धावा करू शकला. दोन्ही डावांमध्ये चेंडू त्याच्या बॅट आणि पॅडच्या फटीतून गेल्याने तो त्रिफळाचित झाला. त्यामुळे शॉच्या तंत्राविषयी सध्या बरीच चर्चा होत असून त्याच्यावर टीकासुद्धा होत आहे. मात्र, शॉसारख्या युवा खेळाडूंना परदेशात यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शनाची गरज असते. त्यामुळे राहुल द्रविडसारखा महान फलंदाज परदेश दौऱ्यात भारतीय संघासोबत गेला पाहिजे, असे इंग्लंडचा माजी क्रिकेटपटू मॉन्टी पनेसारला वाटते.

तुम्ही जेव्हा परदेशात खेळता, तेव्हा तुम्हाला द्रविडसारख्या महान फलंदाजाच्या मार्गदर्शनाची गरज भासते. परदेशातील परिस्थितीशी जुळवून घेण्यात भारतीय खेळाडूंना बरेचदा अपयश येते. त्यामुळे परदेश दौऱ्यांमध्ये भारतीय संघाने द्रविडसारख्या व्यक्तीला प्रशिक्षक म्हणून सोबत नेले पाहिजे. द्रविडने फलंदाज म्हणून परदेशात किती उत्कृष्ट कामगिरी केली होती, हे आपल्याला माहिती आहे. त्याच्या गाठीशी खूप अनुभव आहे. द्रविड भारतीय संघासोबत असल्यास शॉसारख्या युवा फलंदाजांना खूप फायदा होऊ शकते. शॉला द्रविडच्या मार्गदर्शनाची गरज असल्याचे पनेसार म्हणाला. भारतीय संघाने पहिला कसोटी सामना गमावल्यानंतर भारताचे माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर यांनी द्रविडला लगेच ऑस्ट्रेलियात पाठवण्याची बीसीसीआयकडे विनंती केली होती.

First Published on: December 22, 2020 7:51 PM
Exit mobile version