विराटच्या नेतृत्वाला कंटाळून पुजारा, रहाणेंचा जय शहांना कॉल ? BCCI ची आली प्रतिक्रिया

विराटच्या नेतृत्वाला कंटाळून पुजारा, रहाणेंचा जय शहांना कॉल ? BCCI ची आली प्रतिक्रिया

विराट कोहली आणि भारतीय संघातील वरिष्ठ खेळाडू यांच्यात अलबेल नसल्याचे नुकतेच एका बातमीतून समोर आले आहे. चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांनी विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबत थेट बीसीसीआयकडे तक्रार केल्याची माहिती क्रिकेट एडिक्टर डॉट कॉम या संकेतस्थळाने दिली आहे. जूनमध्ये झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपनंतर विराटच्या वागणुकीबाबतचा अनुभव या दोन्ही वरिष्ठ क्रिकेटपटूंनी बीसीसीआयकडे बोलून दाखवल्याची माहिती आहे. भारताने वर्ल्ड क्रिकेट चॅम्पिअनशीप (WTC) मध्ये पराभूत झाल्यानंतर भारतीय संघावर मोठ्या प्रमाणात टीका झाली होती. विराटनेही पुजारा आणि रहाणे या दोन्ही खेळाडूंविरोधात जाहीर नाराजी बोलून दाखवली होती. त्यानंतरच चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेने जय शाह यांना विराटच्या नेतृत्वाबाबत तक्रार केली होती.

विराटने मॅच संपल्यानंतर कशी वागणूक दिली याबाबतची तक्रार जय शाह यांना दोन्ही वरिष्ठ खेळाडूंकडून करण्यात आली होती. तसेच बीसीसीआयने या प्रकरणात लक्ष घालावे अशीही मागणी दोघांकडून करण्यात आली होती. WTC मध्ये न्यूझीलंडने भारताला ८ विकेट्सने पराभूत केले होते. या सामन्यात एकाही भारतीय खेळाडूला ५० धावा करता आल्या नाहीत. रहाणे आणि पुजाराच्या बॅटिंगवरही या सामन्यात टीका करण्यात आली.

न्यू इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या बातमीनुसार विराट कोहली पुजारा आणि रहाणे या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या कामगिरीवर ओरडल्याची माहिती आहे. पुजाराने पहिल्या इनिंगमध्ये ५४ बॉल्समध्ये ८ धावा तर दुसऱ्या इनिंगमध्ये ८० बॉल्समध्ये १५ धावा काढल्या होत्या. तर रहाणेने पहिल्या इनिंगमध्ये ४९ धावा तर दुसऱ्या इनिंगमध्ये ४० बॉल्समध्ये १५ धावा केल्या. अशा कामगिरीमुळेच विराटने आपली नाराजी बोलून दाखवली असल्याचे या संकेतस्थळाने म्हटले आहे.

विराटची नाराजी काय होती ?

जर तुम्ही गोलंदाजांना दबावात आणू शकला नाहीत तर त्यांच्याकडे फिटनेस आणि सातत्य आहे, ज्याच्या जोरावर ते चांगले गोलंदाजी करत तुमची विकेट घेतील. म्हणूनच तुम्हाला धावा करणे गरजेचे आहे. तुम्ही विकेट जाईल म्हणून घाबरून राहिलात तर तुम्ही गोलंदाजांना सामन्यात परतण्याची संधी देत आहात हे लक्षात ठेवा. त्यामुळेच तुमची मानसिकता ही धावा करण्याची असायला हवी. अन्यथा गोलंदाज तुमच्यावर हावी होत विकेट्स काढणारच असेही विराटने स्पष्ट केले होते.

पुजारा, रहाणेचा जय शहांना कॉल

WTC च्या फायनल नंतर चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे या दोघांनीही बीसीसीआयचे सचिव जय शहा यांच्याशी संपर्क साधल्याची माहिती आहे. विराटच्या मैदानाबाहेरील नेतृत्वाबद्दल त्यांनी टीका केली आहे. तसेच बीसीसीआयने या संपुर्ण प्रकरणात लक्ष घालावे, अशीही मागणी त्यांनी केली असल्याचे न्यू इंडियन एक्सप्रेसने बातमी दिली आहे. अशीही माहिती आहे की, या फोन कॉल्सनंतरच बीसीसीआयने इतर खेळाडूंकडून माहिती घेत इंग्लंड दौरा संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतला. कोहलीने इंग्लंड दौऱ्यानंतरच टी २० कर्णधार पदाचा राजीनामा देत असल्याचे स्पष्ट केले. आता बीसीसीआयकडून ५० षटकांच्या सामन्यासाठीही आगामी विश्वचषकानंतर विराटकडून कॅप्टनशीप काढून घेण्यात येणार असल्याचे कळते. विराटने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या फ्रॅंचायसीसाठीच्या संघाचाही कर्णधार पदाचा राजीनामा हा वर्कलोडमुळे देत असल्याचे स्पष्ट केले आहे.

बीसीसीआयची प्रतिक्रिया काय ?

बीसीसीआयने विराट कोहलीच्या नेतृत्वाबाबत वरिष्ठ खेळाडूंनी तक्रार केल्याचे वृत्त फेटाळले आहे. ड्रेसिंग रूममध्ये असा कोणताही प्रकार घडला नसल्याचेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. विराटच्या ड्रेसिंगरूममधील आक्रमक वागण्याबाबत अनेक खेळाडूंच्या तक्रारी होत्या अशा बातम्याही बीसीसीआयने फेटाळल्या आहेत. कोणत्याही भारतीय खेळाडूने बीसीसीआयकडे अशी कोणतीही तक्रार केली नसल्याची माहिती बीसीसीआयचे खजिनदार अरूण धुमाळ यांनी टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्राला दिली आहे. तसेच अशा खोट्या बातम्यांना बीसीसीआय यापुढच्या काळात उत्तरही देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – T20 World Cup : गावस्कर म्हणतात टी-२० विश्वचषकांमध्ये ‘हा’ खेळाडू भारताचा कर्णधार असावा


 

First Published on: September 30, 2021 11:37 AM
Exit mobile version