राफेल नदालची अनोखी कामगिरी; गाठला कारकिर्दीत १००० विजयांचा टप्पा 

राफेल नदालची अनोखी कामगिरी; गाठला कारकिर्दीत १००० विजयांचा टप्पा 

राफेल नदाल

स्पेनचा स्टार टेनिसपटू आणि टेनिस इतिहासातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंपैकी एक राफेल नदालने आणखी एका अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत फेलिसियानो लोपेझचा पराभव केला. हा त्याचा टेनिस कारकिर्दीतील १००० वा विजय ठरला. १००० विजयांचा टप्पा गाठणारा नदाल हा टेनिस इतिहासातील केवळ चौथा खेळाडू ठरला. त्याच्याआधी जिमी कॉनर्स, रॉजर फेडरर आणि इवान लेंडल यांनी ही अनोखी कामगिरी केली होती.

मागील महिन्यातच नदालने फ्रेंच ओपन स्पर्धा तब्बल १३ व्यांदा जिंकली होती. ही स्पर्धा जिंकल्यामुळे त्याने फेडररच्या २० ग्रँड स्लॅम जेतेपदांच्या विक्रमाशी बरोबरी केली होती. आता त्याने पॅरिस मास्टर्स स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत फेलिसियानो लोपेझचा ४-६, ७-६, ६-४ असा पराभव करत कारकिर्दीतील १००० वा विजय मिळवला. ‘मला बऱ्याच गोष्टींचा अभिमान आहे. मी माझ्या कारकिर्दीदरम्यान अनेक दुखापतींचा सामना केला. मात्र, मी जिद्दीने प्रत्येक आव्हानावर मात केली. माझ्यासाठी १००० विजय हे खूप मोठे यश आहे,’ असे नदालने सांगितले.

नदालचा पहिला एटीपी टूर स्पर्धेतील विजय हा एप्रिल २००२ मध्ये वयाच्या १५ व्या वर्षी आला होता. ‘१००० विजय मिळवण्याबाबतची ही नकारात्मक बाब म्हणजे तुम्ही आता बराच काळ खेळला आहात आणि आता तुमचे वय झाले आहे हे यातून दिसते,’ असे नदाल गमतीत म्हणाला. मात्र, मला या कामगिरीचा आनंद असल्याचेही नदालने सांगितले.


सर्वाधिक सामने जिंकणारे टेनिसपटू –      

       खेळाडू              सामने            विजय 

  1.   जिमी कॉनर्स          १५५७            १२७४ 
  2.   रॉजर फेडरर          १५१३             १२४२
  3.   इवान लेंडल           १३१०             १०६८       
  4.   राफेल नदाल          १२०१             १००० 

 

First Published on: November 5, 2020 8:17 PM
Exit mobile version