राहुल द्रविड होता प्रशिक्षकपदाचा मुख्य दावेदार

राहुल द्रविड होता प्रशिक्षकपदाचा मुख्य दावेदार

विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला २०१७ चॅम्पिअन्स ट्रॉफीत पराभवाचा सामना करावा लागला. याकाळात कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक अनिल कुंबळे यांच्यातील वादाच्या अनेक बातम्या समोर आल्या होत्या. भारतीय संघाच्या पराभवानंतर अनिल कुंबळे यांनी आपल्या प्रशिक्षकपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीसीसीआयने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरु केला. माजी भारतीय खेळाडू रवी शास्त्रींकडे प्रशिक्षकपदाची सुत्रे सोपवण्यात आली. मात्र, २०१७ मध्ये राहुल द्रविड हा भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदासाठी मुख्य दावेदार असल्याचं, तत्कालीन क्रिकेट प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी सांगितलं. Sportskeeda ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा खुलासा केला.

विनोद राय म्हणाले, त्यावेळी राहुलचं नाव प्रशिक्षकपदासाठी आघाडीवर होतं. आमचं त्याच्याशी बोलणंही झालं होतं. पण आपल्याला परिवाराला वेळ द्यायचा आहे हे कारण सांगत राहुल द्रविडने ही ऑफर नाकारली. माझ्या घरात दोन मुलं असून मला त्यांच्यासोबत आणि माझ्या परिवारासोबत राहणं गरजेचं वाटत आहे, असं राहुल म्हणाला. गेली अनेक वर्ष मी संघासोबत जगभर फिरत होतो, त्यावेळी मला परिवाराला वेळ देणं जमलं नाही. राहुलचं म्हणणं पटल्यानंतर बीसीसीआयने मुलाखती घेण्याचं ठरवल्याचं राय यांनी सांगितलं.


हेही वाचा – २००२ नेटवेस्ट मालिका जिंकल्यावर बेभान झालो – गांगुली


विरेंद्र सेहवाग, टॉम मुडी आणि रवी शास्त्री ही तीन नावं शर्यतीत होती. या तिघांमध्ये झालेल्या शर्यतीत दोन वर्ष टीम इंडियाचे मॅनेजर म्हणून काम पाहणाऱ्या शास्त्रींच्या हातात प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली. सुरुवातीला रवी शास्त्री देखील या पदासाठी उत्सुक नव्हते. परंतू विराटने केलेल्या विनंतीनंतर, बीसीसीआयने अर्जासाठीची तारीख वाढवली आणि शास्त्री यांनी प्रशिक्षकपदासाठी अर्ज भरला. २०१९ विश्वचषकात भारतीय संघाचं आव्हान संपुष्टात आल्यानंतर, शास्त्रींचा करार संपला होता. मात्र, बीसीसीआयने २०२१ टी-२० विश्वचषकापर्यंत शास्त्रींना करारात मुदतवाढ दिली आहे.

 

First Published on: July 6, 2020 6:26 PM
Exit mobile version