नागपुरात आज होणाऱ्या भारत-ऑस्टेलिया टी-२० सामन्यावर पावसाचे सावट

नागपुरात आज होणाऱ्या भारत-ऑस्टेलिया टी-२० सामन्यावर पावसाचे सावट

नागपूर – मोहालीतील लढतीत ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात मंगळवारी भारताचा पराभव झाला होता. दरम्यान आज भारतीय संघ दुसऱ्या टी-२० सामन्यात ऑस्ट्रेलियाशी सामना खेळणार आहे. नागपुरात होणाऱ्या या सामन्यावर पावसाचे सावट आहे. याबाबत अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

पुढील महिन्यात ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० वर्ल्ड कपपूर्वीची रंगीत तालीम म्हणून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील या मालिकेकडे पाहिले जात आहे. विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या जामठा येथील क्रिकेट स्टेडियमवर हा सामना होत आहे. या मैदानावर नोव्हेंबर २०१९मध्ये झालेल्या लढतीत भारताने बांगलादेशचा २९ धावांनी पराभव केला होता.

पावसाचे अंदाज –

नागपुरात तीन वर्षांनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामना होत असल्यामुळे विदर्भासह मध्य भारतातील क्रिकेटप्रेमींमध्ये प्रचंड उत्साह आहे. मात्र, शुक्रवारी नागपूरसह विदर्भात सर्वत्र पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. गुरुवारी दिवसभर शहरात ढगाळ वातावरण होते. त्यामुळे दोन्ही संघांनी सराव केला नाही. पावसामुळे मैदान खराब होऊ नये यासाठी मैदानभर कव्हर टाकण्यात आले आहे. पावसाने उसंत घेतली तर विनाअडथळा सामना खेळवला जावा, याची संपूर्ण तयारी विदर्भ क्रिकेट असोसिएशनने केली आहे. दरम्यान, शुक्रवारी पावसाचा अंदाज असला तरी सायंकाळी तशी शक्यता फार कमी आहे. पाऊस आला तरी तो थोड्या वेळासाठी असेल, असे हवामान खात्यातील सूत्रांनी सांगितले.

First Published on: September 23, 2022 11:03 AM
Exit mobile version