रमेश पोवार इज बॅक! दोन वर्षांनंतर पुन्हा भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी

रमेश पोवार इज बॅक! दोन वर्षांनंतर पुन्हा भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी

रमेश पोवारची पुन्हा भारतीय महिला संघाच्या प्रशिक्षकपदी वर्णी

भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवारची पुन्हा एकदा भारतीय महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे. कर्णधार मिताली राजसोबत झालेल्या वादविवादानंतर पोवारची महिला संघाच्या प्रशिक्षकपदावरून हकालपट्टी करण्यात आली होती. परंतु, दोन वर्षांनंतर पोवारचे मुख्य प्रशिक्षकपदी पुनरागमन झाले आहे. तो आता डब्ल्यूव्ही रमण यांची जागा घेईल. मदन लाल अध्यक्षीय क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) आठ उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे (BCCI) पोवारच्या नावाची शिफारस केली होती. त्यामुळे बीसीसीआयने पोवारची पुन्हा भारतीय क्रिकेट महिला संघाच्या प्रशिक्षकपदी नेमणूक केली.

३५ हूनही अधिक उमेदवारांचे अर्ज

रमेश पोवारची भारतीय सिनियर महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड झाल्याची बीसीसीआय घोषणा करत आहे. बीसीसीआयने या पदासाठी जाहिरात दिल्यानंतर ३५ हूनही अधिक उमेदवारांनी आपले अर्ज पाठवले होते, असे बीसीसीआयने त्यांच्या पत्रकात म्हटले. भारताचा माजी यष्टीरक्षक अजय रात्रा, माजी प्रशिक्षक रमण आणि चार माजी महिला क्रिकेटपटू मुख्य प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत होत्या. मात्र, सल्लागार समितीने अखेर ४२ वर्षीय मुंबईकर पोवारच्या नावाची शिफारस केली.

प्रशिक्षकपद भूषवण्यास उत्सुक 

भारतीय महिला क्रिकेटला पुढे घेऊन जाण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. मला प्रशिक्षकपद भूषवण्याची संधी दिल्याबद्दल मी बीसीसीआय आणि सल्लागार समितीचे आभार मानतो, असे पोवारने ट्विट केले. मिताली राज अजूनही भारताच्या एकदिवसीय संघाची कर्णधार आहे. त्यामुळे ती आणि पोवार आपापसातील वाद संपवून भारतीय क्रिकेटला कशाप्रकारे पुढे नेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष असेल.

First Published on: May 13, 2021 9:07 PM
Exit mobile version