IND vs ENG : भारताने अश्विनला वनडेत संधी द्यावी; ‘या’ माजी क्रिकेटपटूचे मत

IND vs ENG : भारताने अश्विनला वनडेत संधी द्यावी; ‘या’ माजी क्रिकेटपटूचे मत

रविचंद्रन अश्विन

भारताचा अनुभवी ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन सध्या चांगल्या फॉर्मात आहे. त्याने ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील कसोटी मालिकेत तीन सामन्यांत १२ विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्याने कामगिरीत आणखी सुधारणा केली असून सध्या सुरु असलेल्या इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतील तीन सामन्यांत अश्विनने सर्वाधिक २४ विकेट घेतल्या आहेत. तसेच त्याने नुकतेच कसोटी क्रिकेटमध्ये ४०० बळींचा टप्पा पार केला. कसोटीतील या दमदार कामगिरीनंतरही अश्विनला एकदिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्ये संधी मिळत नाही. त्याने २०१७ नंतर भारताकडून मर्यादित षटकांचा सामना खेळलेला नाही. परंतु, आता त्याला एकदिवसीय क्रिकेटमध्ये पुन्हा संधी देण्याची वेळ आली आहे, असे ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगला वाटते.

भारताची फलंदाजी मजबूत होईल

अश्विनचे एकदिवसीय संघात पुनरागमन होऊ शकेल का? असा प्रश्न भारताच्या एका चाहत्याने ट्विटरच्या माध्यमातून हॉगला विचारला. याचे उत्तर देताना हॉग म्हणाला, ‘अश्विनची अष्टपैलू म्हणून एकदिवसीय संघात निवड होऊ शकते. त्याच्या समावेशाने भारताची फलंदाजी अधिक मजबूत होईल. त्यामुळे वरच्या फळीतील फलंदाजांना सुरुवातीपासूनच आक्रमक शैलीत खेळता येऊ शकेल. तसेच गोलंदाज म्हणून त्याच्यात विकेट घेण्याची क्षमता आहे. तसेच तो फारशा धावाही देत नाही. त्यामुळे भारताने अश्विनला एकदिवसीय संघात पुन्हा संधी द्यायची वेळ आली आहे.’ अश्विनने आतापर्यंत १११ एकदिवसीय सामन्यांत १५० विकेट घेतल्या आहेत.

First Published on: March 1, 2021 8:26 PM
Exit mobile version